सहसंपर्कप्रमुख सचिन कदम यांचा सेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

चिपळूण:- शिवसेनेचे माजी उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख व विद्यमान सहसंपर्कप्रमुख सचिन कदम यांनी आपल्या पदासह शिवसेना उबाठाच्या सदस्यत्वपदाचा देखील राजीनामा दिला आहे. तब्बल 40 वर्षे शिवसेनेच्या विविध पदावर सक्रिय असणार्‍या एका जुन्या शिवसैनिकाने राजीनामा दिल्याने उत्तर रत्नागिरीतील शिवसेना गोटात खळबळ उडाली आहे. त्यांना शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांचे खंदे समर्थक मानले जाते.

याबाबत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आपले राजीनामा पत्र सादर केले आहे. यामध्ये आपण व्यक्तिगत कारणासाठी हा राजीनामा देत असून आपण पक्षाच्या कामासाठी वेळ देऊ शकत नसल्याने सहसंपर्कप्रमुख व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. अवघ्या चार ते पाच ओळींचे पत्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. यामध्ये, आपण चाळीस वर्षे शिवसेनेमध्ये सक्रिय असल्याचे आवर्जुन नमूद केले आहे. त्यांनी चिपळूण शहरामध्ये नगरसेवक पद भूषविले असून शहरातील संघटनेत महत्त्वपूर्ण काम केले.

या शिवाय गुहागर विधानसभा मतदारसंघात देखील त्यांनी या आधीच्या विधानसभा निवडणुकीची तयारी केली होती व हा मतदारसंघ पिंजून काढला होता. चिपळूण मतदारसंघातून भास्कर जाधव हे आमदार असताना तत्कालीन जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि आ. भास्कर जाधव यांच्यात वाद उफाळला होता. त्यानंतर आ. जाधव यांनी शिवसेनेचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर सचिन कदम गुहागरमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक असताना आ. जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर त्यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक आ. जाधव यांनी आयोजित केली होती. यावेळी या बैठकीत, जे काम करीत नाही त्यांना बदलण्याची हिंमत नसल्याची टीका करून शिवसेनेची काँग्रेस होतेय, अशी झोड उठविली होती. या पार्श्वभूमीवर सचिन कदम यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा सुरू आहे.