चार गावातील 20 जणांना 64 लाख 75 हजारांची नुकसान भरपाई मंजूर
रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अनेक गोरगरिब व्यावसायिकांचे व्यवसायाचे खोके, टपर्या उठवण्यात आल्या होत्या. या व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी होत होती. यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री रविंद्र चव्हाण आणि आम. किरण सामंत हे केंद्रस्थरावर पाठपुरावा करीत होते. या पाठपुराव्याला यश आला असून, पहिल्या टप्प्यात आरवली, तुरळ, माभळे, वांद्री या चार गावातील 20 जणांना 64 लाख 75 हजारहून अधिक रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. 24 जानेवारीला याचे वितरण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
गेली अनेक वर्ष मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु असून, यासाठी संपादीत करण्यात आलेली जागा, घरे यांचा मोबादला ही 90 टक्केहून अधिक लोकांना मिळाला आहे. मात्र काही ठिकाणी अनेक वर्ष छोटेमोठे व्यवसाय महामार्गा लगत करणार्या खोके व टपरी चालकांना काहीच मिळाले नव्हते. याठिकाणच्या जागामालकांनाही मोबदला मिळाला होता. काही व्यावसायिक हे शासकीय जागेमध्येही व्यवसाय करीत होते. या सर्व छोट्या व्यावसायिकांनी आपल्यालाही मोबदला मिळावा म्हणून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह आमदार किरण सामंत यांच्याकडे विनंती केली होती. यासंदर्भात या छोट्या व्यावसायिकांच्या बैठकाही पार पडल्या होत्या. यामध्ये पहिल्या टप्प्यात संगमेश्वर तालुक्यातील आरवली, तुरळ, माभळे व वांद्री गावच्या हद्दीतील 20 व्यावसायिकांना मोबदला मंजूर झाला आहे.
आरवलीमधील किर्ती राजेंद्र कुळ्ये, जयवंत बाळकृष्ण कुलकर्णी, प्रज्ञा प्रसाद कुलकर्णी, संतोष जयसिंग अंबोरे, दत्तात्रय विश्राम आंबवकर, तुरळ येथील बाळकृष्ण बाबू बामणे, मनोहर वसंत कुंभार, माभळे येथील दिलीप कृष्णा पेंढारी, प्रकाश बाळ घडशी, विजय यशवंत गिते, अनंत सखाराम वेलणकर, पुरुषोत्तम गुणाजी घडशी, मनोहर सोनू गिते, श्रीकांत टोलू घडशी, संजय अनंत घडशी, मंगेश सोमा सितम तर वांद्री येथील सुशिला गणपत पाखरे, वनिता मधुसूदन वहाळकर, गणपत मृगू खापरे, मनोहर शांताराम रेडीज या वीस जणांना पहिल्या टप्प्यात 64 लाख 75 हजार 992 रुपयांच्या धनादेशाचे वाटप पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 24 जानेवारी रोजी होणार आहे.
या तीनही लोकप्रतिनिधींनी या खोकेधारकांना दिलेली आश्वासनांची पूर्तता पुढील चार दिवसात केली जाणार आहे. या वीसजणांसोबतच आणखी काही छोटे खोकेधारक व टपरीचालक असून त्यांनी नुकतीच आ. किरण सामंत यांची भेट घेऊन मोबदला मिळावा म्हणून मागणी केली होती. त्यानंतर नुकतीच मुंबईत आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रादेशिक अधिकारी, महामार्गाचे मुख्य अभियंता शेलार, कार्यकारी अभियंता कुलकर्णी, रत्नागिरीचे प्रांत जीवन देसाई, चिपळूणचे प्रांत आकाश लिगाडे, राजापूरच्या प्रांताधिकारी डॉ. जस्मीन उपस्थित होत्या. या बैठकीत या उर्वरीत व्यावसायिकांनाही लवकरच मोबदला मिळेल अशी आशाही आ. किरण सामंत यांनी व्यक्त केली.
खोकेधारकांना मोबदला मंजूर होणार हे लक्षात आल्यानंतर काही राजकीय पुढारी आपल्यामुळेच हे साध्य झाले असल्याचा कांगावा करु लागले आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री रविंद्र चव्हाण आणि आम. किरण सामंत यांच्या पाठपुराव्या मुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याचे खोकेधारकांनी सांगितले.