नागपूरच्या पर्यटकाचा रत्नागिरीत मृत्यू

रत्नागिरी:- नाताळच्या सुट्टीत पर्यटनासाठी रत्नागिरीत दाखल झालेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. हे कुटुंंब रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर त्यांच्यातील एका सदस्याचा हदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवार 30 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

सचिन श्रीकृष्णराव तेलरांधे (वय 45, मूळ रा. मनीषनगर नागपूर) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढ पर्यटकाचे नाव आहे. तेलरांधे कुटुंब पर्यटनासाठी नागपूरहून रत्नागिरीला आले होते. सोमवारी सकाळी 9.30 वा. सुमारास तेलरांधे कुटुंब रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर उतरले असता त्यातील सचिन तेलरांधे यांच्या छातीत कळ येऊन दुखू लागले. त्यांच्या नातेवाईकांनी आणि रेल्वे कर्मचार्‍यांनी मिळून त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सायंकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.