रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि भगवती किल्ल्याजवळील शिवसृष्टीचे लोकार्पण आणखी दोन दिवस लांबणीवर पडले आहे. दि. 4 ऑक्टोबर रोजी होणारे लोकार्पण सहा ऑक्टोबर रोजी होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पूर्वनियोजित व्यस्त वेळापत्रकामुळे लोकार्पण सोहळा लांबणीवर गेला आहे.
रत्नागिरी न.प.च्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व शिवसृष्टीचे प्रथम दोन ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्याचे ठरले होते. त्यानंतर ही तारीख चार ऑक्टोबर झाली होती. आता मात्र सहा ऑक्टोबर रोजी लोकार्पण सोहळा होणार आहे.
भगवती किल्ला येथील शिवसृष्टी प्रकल्प रत्नागिरीच्या सौदर्यात भर घालणारा आहे. त्याचबरोबर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्व मोफत सेवा सर्वसामान्य रुग्णांना मोठा आधार ठरणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून इतर अनेक विकास कामांसह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि शिवसृष्टी साकारत आहे.