रत्नागिरी:- कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गेल्या सहा वर्षात राबवण्यात आलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी सुमारे 12 कोटीपेक्षा जास्त निधी खर्ची पडला आहे. यावर्षीही ही योजना प्राधान्याने राबविण्यात येणार असून, योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे योजनेच्या उद्दीष्टात वाढ करण्यात आली आहे.
योजनेत तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शेतीपूरक रोजगार मिळवला. शासनाकडून थेट बँक खात्यात मजुरी जमा झाल्याने शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे.
सन 2018-19 मध्ये 434.80 हेक्टर क्षेत्रावर 619 मजुरांनी लागवड केली. यासाठी 1 कोटी 80 लाख 46 हजार 26 रुपयांचा निधी खर्ची पडला. 2019-20 मध्ये 749 मजुरांनी 561.95 हेक्टर क्षेत्रावर 2 लाख 25 हजार 339 रुपये खर्ची पडले. 2020-21 मध्ये 381.45 हेक्टर क्षेत्रावर 629 लाभार्थी मजुरांनी लागवड केली. यासाठी 1 कोटी 72 लाख 745 रुपये खर्ची पडले. 2021-22 मध्ये 595 मजुराने 356.25 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली. यासाठी 2 कोटी 84 लाख 87 हजार 238 रुपयांचा निधी खर्ची पडला. 2022-23 मध्ये 260.70 हेक्टर क्षेत्रावर 424 मजुरांनी लागवड केली. यासाठी 1 कोटी 69 लाख 8 हजार 836 रुपयांचा निधी खर्ची पडला. 2023-24 आर्थिक वर्षात 512 लाभार्थी मजुरांनी 290.60 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली. त्यासाठी 1 कोटी 42 लाख 33 हजार 695 रुपयांचा निधी खर्ची पडला.
चालू आर्थिक वर्षातही योजनेतील लागवडीचे प्रस्ताव प्रगतीपथवार आहे. यासाठी सुमारे अडीच कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
गेल्या सहा वर्षात तालुक्यातील दीडशेहून अधिक गावांमधील 2285.75 हेक्टर क्षेत्रात आंबा, काजू, नारळ, चिकू, साग आदी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यासाठी 3528 मजुरांना 11 कोटी 84 लाख 1 हजार 879 रुपयांचा शासनाचा निधी खर्ची पडला.









