बसणीतील दुचाकीस्वार मृत्यूप्रकरणी अज्ञात मोटारचालकाविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरापासून जवळच असणाऱ्या कोतवडे मार्गावरील बसणी नागझरी फाटा येथील अवघड वळणावर दुचाकीस्वाराला मोटारीची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पण ग्रामस्थांनी त्या अपघाताच्या संशयावरून पाठलाग करून पकडलेल्या त्या मोटार चालक तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पण या अपघाताच्या दाखल गुन्ह्यात अज्ञात चालक म्हणून नोंद करण्यात आली आहे.

ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात सौरभ मधकर काजरेकर (२५, रा. डोंगरेवाडी-पाली, रत्नागिरी) गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता. ही घटना शुक्रवारी १३ सप्टेंबर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बसणी येथील नागजरी वळणावर घडली होती.

सौरभ शुक्रवारी दुपारी बसणीहून दुचाकी (क्र. एमएच-०८ वाय ८५६२) सोबत वृषाली जगदीश धाडवे २१ रा.. उमरे चांदेराई, रत्नागिरी) हिला घेऊन रत्नागिरीकडे येत असताना हा गंभीर अपघात घडला होता. सौरभ आपल्या एमएच ०८, वाय ८५६२ या दुचाकीवरून रत्नागिरीकडे येत असताना त्यावेळी समोरून रत्नागिरीहून येणारी ग्रे रंगाच्या टाटा सुमोने जोरदार धडक दिली होती. त्या धडकेत सौरभच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत होउन त्याचे रुग्णालयात निधन झाले. तर त्याच्यामागे बसलेल्या सहकारी युवतीसही दुखापती झाली होती.

या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिसांकडे यादिवशी रात्री उशिरा करण्यात आली. अपघातानंतर ग्रामस्थांनी लगेचच त्या मार्गावर एका मोटारीला अपघाताच्या संशयावरून पाठलाग करून पकडले होते. त्यानंतर चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पण हा अपघातात आरोपी अज्ञात असल्याची नोंद करण्यात आली आहे.