चिपळूण:- शासनाच्या राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२४-२०२४ या आर्थिक वर्षात चिपळूण तालुक्यातील १४८ लाभार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी अवजारे खरेदी केलेल्या ७२ शेतकऱ्यांना चिपळूण कृषी विभागातर्फे १६ लाख ४७ हजार रुपये वितरीत करण्यात आले आहे. ही निवड लॉटरी पद्धतीने करण्यात आली, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न मेहत्रे यांनी दिली.
महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या लागणारे औजारे उदा. ट्रॅक्टर, पॉवर टिलर व इतर औजारांसाठी लाभ घेता येतो. या योजनेत अनुसूचित जाती-जमाती घटकांतील, २ हेक्टरपेक्षा जमीन, सर्वसाधारण प्रवर्गातील महिला शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान तर सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते.
या योजनेंतर्गत चिपळूणमधील शेकडो शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. यामध्ये २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात लॉटरी पद्धतीने १४८ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. यापैकी अवजारे खरेदी केलेल्या ७२ शेतकऱ्यांना १६ लाख ४७ हजार रुपये वितरीत करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. यातून शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.