गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार नाहीत याची दक्षता घ्या: ना. सामंत

रत्नागिरी:- गणेशोत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यासाठी मुंबई, पुण्यातून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येतील. त्या चाकरमान्यांना महामार्गावर कोणती अडचण होणार नाही, याची दक्षता घ्या. ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते भरून घ्या. पोलिसांशी समन्वय साधून महामार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग १६६ आणि ६६ या दोन्हीच्या कामाचा आढावा घेताना ना. सामंत बोलत होते. या बैठकिला एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, डॉ. अमरेश आगाशे, डॉ. सांगवीकर, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री सामंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी शहरातील रस्ते, लोकमान्य टिळक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कॅशलेस, वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयातील कामकाजाची माहिती घेतली.

रत्नागिरी शहरातील तारांगण येथे सुरू असलेल्या सायन्स गॅलरी च्या कामाचा मंत्री सामंत यांनी आढावा घेतला. गॅलरीचे काम पूर्ण झाले असून, इतर काम अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्याधिकारी बाबर यांनी सांगितले. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यांनी दिल्या. लोकमान्य टिळक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कॅशलेस करा असेही त्यांनी सांगितले. कॅशलेस हॉस्पिटलचे उद्घाटन १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान करायचा आहे. त्यामुळे आवश्यक ती कार्यवाही तातडीने करा असे त्यांनी दिली. या वेळी मुख्याधिकारी बाबर यांनी कॅशलेस हॉस्पिटलसंदर्भात सुरू असलेल्या कामाची माहिती दिली.

रुग्णांच्या अडचणी सोडवा

जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रिक्त पदे, भूलतज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ या संदर्भात कोणतीही अडचण येणार नाही आणि रुग्णांच्या सेवेत अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा कडक सूचना पालकमंत्री सामंत यांनी प्रशासनाला दिल्या.