गर्भपात प्रकरण; जिल्ह्यात आणखी काही डॉक्टर रडारवर

रत्नागिरी:- गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरणात आणखी काही जिल्ह्यातील डॉक्टर रडारवर आले आहेत. मुलींची संख्या कमी होत असताना, रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात अशा गोष्टी घडणे हे चुकीचे असल्याचे मत आरोग्य यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालय आणि पोलीस यंत्रणेनेने चार दिवसापूर्वी रत्नागिरी शहरालगतच्या एका रुग्णालयावर कारवाई करीत गर्भपाताची औषधे जप्त केली होती. याबाबत कारवाई सुरु झाली असली तरी रत्नागिरीमध्ये आणखी चार ते पाच डॉक्टर असे प्रकार करीत असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अधिकार्‍यांना मिळाली आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टरांकडेही आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे.

साई हॉस्पीटलवर झालेल्या कारवाई वेळी आरोग्य यंत्रणेने एका गरोदर महिलेली मदत घेतली होती. ही महिला आरोग्य यंत्रणेच्या सूचनेनुसार साई हॉस्पीटलमध्ये गेली होती. यावेळी तपासणी करुन या महिलेला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्याचे हजारो रुपये पैसेही डॉक्टरांना दिले गेले होते. त्यानंतर तातडीने या हॉस्पीटलवर पोलिसांना घेऊन कारवाई झाली होती.

या डॉक्टरांकडे वैद्यकीय सर्टीफिकेट असले तरी गर्भपात किंवा गर्भनिदान करण्याचे अधिकार त्यांना नसल्याने ही कारवाई करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात आणखी काही डॉक्टर अशा पध्दतीने उपचार करीत असल्याची माहितीही जिल्हा रुग्णालयाला मिळाली असून, या डॉक्टरांवरही जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत.