पावसाचे दमदार पुनरागमन; जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

रत्नागिरी:- दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच रत्नागिरी, लांजा, साखरपा, देवरूख, संगमेश्वरसह समुद्री किनारपट्टी भागात धुव्वाधार पाऊस कोसळला.यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले असून ग्रामीण भागातील अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. मुसळधार पावसामुळे समुद्राला उधाण आले असून रत्नागिरीतील समुद्रकिनारी लाटांचे लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे. उंच उसळणाऱ्या लाटा संरक्षक बंधाऱ्यावरूनही मानवी वस्तीकडे येत असल्यामुळे किनारी भागातील नागरिक भयभीत झाले आहेत.

सोमवार, मंगळवारी मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेत कडक ऊन पडले होते. शुक्रवार सकाळपासून ढगाळ वातावरण सुरू होते. सकाळी 10 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रत्नागिरी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मांडवी भागात वस्तीमध्ये दोन ते फूट पाणी भरले होते. त्यामुळे मांडवी गावातील अंतर्गत रस्ते बंद झाले होते. समुद्राला जाणारे नाले बुजल्याने पाणी वाहण्यासाठी मार्ग न मिळाल्याने त्याचे पर्यावसन पाणी तुंबण्यात झाले. त्याचा फटका स्थानिकांना बसला. मांडवी येथील किनारी भागात असलेल्या काही बंगल्यांमध्ये पावसाचे पाणी घुसले होते.
समुद्र किनारी असलेल्या पंधरामाड, जाकिमिऱ्या, अलावा या किनारी भागात समुद्राच्या प्रचंड मोठ्या लाटा तांडव करत होत्या. नव्याने बांधलेल्या संरक्षक बंधाऱ्यामुळे किनारी भागातील घरांना काहीअंशी सुरक्षितता मिळाली असली तरी लाटांच्या तडाख्यामुळे बंधाऱ्याचा खालचा भाग काही ठिकाणी वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसाचा तडाखा ग्रामीण भागालाही बसला. रत्नागिरी तालुक्यासह लांजा, देवरूख, संगमेश्वर येथेही ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अंतर्गत रस्ते बंद झाले होते. काही ठिकाणी वाड्यांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक ठप्प झाली. रात्री उशिरापर्यंत धुव्वाधार पाऊस सुरूच होता. याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही झाला. पावसामुळे एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातून येणारे ग्राहक बाजारपेठेत पोहोचले नाहीत.