कोणत्याही जाती धर्माचा संशयित असेल तरी त्याच्यावर कारवाई करा: ना. सामंत

रत्नागिरी:- रत्नागिरीत चार दिवसांपूर्वी गोवंशाचे जे शीर सापडले होते. त्याबाबत जे कुणी विघातक कृत्य केलेय हा प्रकार निंदाजनक असून या प्रकरणाचा योग्य तपास करुन, कोणत्याही जाती धर्माचा संशयित असेल तर त्याच्यावर कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना आपण पोलीस अधीक्षकांना दिल्या असल्याचे पालकमंत्री व रत्नागिरीचे आमदार ना. उदय सामंत यांनी सांगितले. पण घडल्या प्रकाराबाबत पोलिसांना देखील तपास करण्याची संधी द्यावी. अशी घटना वारंवार घडू नये यावर कायमस्वरूपी प्रतिबंध झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

रत्नागिरीतील शासकीय व़िश्रामगृह येथे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ज्यादिवशी गोवंशाचे शीर निदर्शनास आले. पोलिसांना योग्य त्या सूचना देऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या प्रकाराबाबत जनतेच्या मनात निर्माण झालेल्या शंका तपासून घेत यातील गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जनतेची असून, आज समाजा-समाजात, धर्मा-धर्मात वाद लावण्याचे प्रयत्न कुणी करत असतील, तर अशा विघातक वृत्तींना पायबंद घातला पाहिजे असेही ना.सामंत यांनी सांगितले आहे.

त्याचप्रमाणे गोवंशाची जर तस्करी होत असेल तर जिल्हा पोलीस अधिक्षकांनाही तपासाचे निर्देश दिले आहेत. हे कृत्य करणारा कोणत्याही जाती-धर्मा असला तरी त्याच्यावर कडक कारवाई करावी. सीसीटिव्ही फुटेज तपासणी, लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम पोलिसांनी सुरू केलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मुळापर्यंत पोलिसांनी पोहोचले पाहिजे. जे निदर्शनास आले ते पुराव्यानिशी सिध्द झाले पाहिजे असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
मोर्चा काढणे हा लोकशाहीतला प्रकार आहे. आंदोनकर्त्यांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. त्यामुळे या घटनेत कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. असे उद्योग कुणी करत असतील तर कडक कारवाई करण्यात यावी. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. यासंदर्भात मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांची देखील हिच भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.