रेल्वेतून पडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

खेड:- कोकण मार्गावरून धावणाऱ्या दिवा- रत्नागिरी पॅसेंजरमधून प्रवास करणाऱ्या तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास महाड तालुक्यातील उंदेरी- वाजेवाडीनजीक घडली.

संकेत पांडुरंग गोठल (२०, रा. भडगाव-मधलीवाडी खेड) असे मृत तरूणाचा नाव आहे. संकेत गोठल हा दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून खेडला येत होता. दरवाजात उभा असताना अचानक त्याचा तोल गेल्याने खाली पडून जागीच मृत्यू झाला.

याबाबत माहिती मिळताच महाड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार दाभाडे आदींसह महाशक्ती रूग्णवाहिकेचे अनिल चव्हाण तातडीने घटनास्थळी पोहचले. २ किमी अंतरापर्यंत रूळावरून चालत जात मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतचा अधिक तपास महाड पोलीस करत आहेत.

मोठ्या भावाची भेट ठरली शेवटची

संकेत गोठल हा मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या मोठ्या भावाला भेटण्यासाठी २१ जून रोजी तुतारी एक्सप्रेसने गेला होता. सोमवारी तो पुन्हा दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून गावी येत होता. दरवाजात बसलेला असतानाच तोल गेल्याने त्याला प्राणास मुकावे लागले. त्याचा मृतदेह रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडताच महाड पोलिसांना कळवण्यात आले. त्याच्या खिशातील ओळखपत्रावरून महाड पोलिसांनी तालुक्यातील भडगाव येथील नातेवाईकांशी संपर्क साधला. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक तातडीने महाडच्या दिशेने रवाना झाले.