गुहागर:- तालुक्यातील महिला सरपंच उर्वी मोरे यांनी आत्महत्या केल्याने पिंपर गावाला धक्का बसला आहे. गावात कोणताही वाद किंवा विवादास्पद कोणतीही गोष्ट घडलेली नसताना महिला सरपंचाने आत्महत्या का केली, याचा शोध पोलिस घेत आहेत.
तालुक्यातील पिंपर येथील सरपंच उर्वी उदय मोरे (वय ३२) यांनी ३ मेला रोजी दुपारी तणनाशक घेतले. अत्यवस्थ झालेल्या उर्वी मोरे यांना नातेवाइकांनी तातडीने श्रृंगारतळीला येथील दवाखान्यात नेले. पुढील उपचारासाठी तातडीने उर्वीला डेरवण येथील रुग्णालयात हलवले. तेथे उपचार घेत असताना ५ मे रोजी पहाटे मोरे यांचा मृत्यू झाला. त्यांनी विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची नोंद ५ मे रोजी सावर्डे पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर या घटनेची माहिती गुहांगर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास व्ही. व्ही. वायंगणकर करीत आहेत.