आसगे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

लांजा:- साखरपुडा समारंभाला जाणाऱ्या मोटारसायकलला अज्ञात वाहनांची धडक बसून एकजण जागीच ठार तर एकावर उपचारासाठी घेवून जात असताना मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी २.३० वा दरम्याने आसगे येथील कोल्हे झरीच्या वळणावर घडली आहे.

तालुक्यातील गोविळ घावरेवाडी येथील अशोक अर्जुन जाधव (वय – ४६) हे आपल्या ताब्यातील शाइन मोटारसायकल क्र. ( एम. एच. ०८ एक. एच. १९६०) घेवून तळवडे येथील सावंतवाडी येथे आपल्या चुलत भाऊ प्रकाश साबाजी जाधव ( वय – ६२ ) यांना घेवून जात होते. आसगे कोलेजरीचा पऱ्या येथील वळणावर २.३० वा दरम्याने आले असता कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकला धडक दिली. यामध्ये अशोक जाधव याला लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेले प्रकाश जाधव यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे घेवून जात असतानाच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली अपघातामध्ये अशोक व प्रकाश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे .

घटनेची माहिती लांजा पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस फौजदार भालचंद्र रेवणे, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे, नासिर नावळेकर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला अधिक तपास पोलीस करीत आहेत .