रत्नागिरी:- कोकणात प्रकल्प आणण्यासाठी शिवसेनेचा विरोध नाही. मात्र हे प्रकल्प आणण्याच्या नावाखाली इथल्या जमिनी हडप करण्याचा जो प्रकार आहे त्याला सेनेचा विरोध आहे. जमिनी हडपण्याचा प्रयत्न आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही असे ठाम मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. विनायकजी राऊत यांच्या प्रचारार्थ गुरुवारी रोजी हरचेरी व नाचणे जिल्हापरिषद गटाचा मेळावा बालाजी मंगल कार्यालय, नाचणे याठिकाणी संपन्न झाला. या मेळाव्याला युवासेना शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुका प्रमुख बंडया साळवी, राष्ट्रवादीचे बशीरभाई मुर्तूझा, काँग्रेसच्या न्याय व विधी शाखेच्या ऍड. अश्विनी आगाशे, मुश्ताक मुल्ला, हरचेरी विभागप्रमुख महेंद्र झापडेकर, उप जिल्हा प्रमुख शेखर घोसाळे, संजय पुनस्कर, प्रमोद शेरे, रिझवाना शेख, संजय साळवी, दुर्गेश साळवी, प्रसाद सावंत, आबा घोसाळे आदी इंडिया आघाडीचे मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम्ही कधीच सामंत कुटुंबियांचा अवमान केला नाही किंवा असंस्कृत, असंसदीय शब्दात त्यांचा उद्धार केला नाही. परंतु, भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी ते केलं. स्वतः राणे केंद्रात उद्योग खात्याशी निगडित असलेले खाते सांभाळत असताना रत्नागिरीत उद्योग-धंदे बंद झाले असे जेव्हा सांगतात तेव्हा ते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निष्क्रियेतेवर बोट ठेवत आहेत असेही विनायक राऊत यांनी सांगितले.
नऊ राजकीय हत्त्यांचा ज्यांच्यावर आरोप होतो अशा व्यक्तीला भाजपने येथून उमेदवारी दिली आहे. आता आपण ठरवायचे आहे की अश्या व्यक्तीला आपण आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवणार का..? असा प्रश्न विनायक राऊत यांनी उपस्थितांना केला. आमचा विरोध हा प्रकल्प आणायला नाही. परंतु, कोकणाला उध्वस्त करणारे प्रकल्प आणि अशा प्रकल्पांच्या नावाखाली बकासुरी वृत्तीने बळकवण्यात येणाऱ्या जमिनीला आमचा विरोध आहे व तो कायम राहील असे ही त्यांनी ठामपणे सांगितले. त्याचप्रमाणे जमीन दिली नाही तर हातपाय तोडण्याची भाषा करतात त्यांना आम्ही येथे आहोत तोवर हे शक्य नाही असे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सिडको आणि एनआरसी बाबत लोकांना जागृत केले तर राणे कुटुंबीय हे जाती धर्मात, द्वेष निर्माण करत आहेत, कौटुंबिक द्वेष निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अश्या प्रवृत्तीला रोखायचे असेल तर 7 मे ला मशाल चिन्हासमोरील बटण दाबण्याचे त्यांनी सर्वांना आवाहन केले.