रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवार २२ एप्रिल ही अंतिम मुदत आहे. या जागेसाठी ९ उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत केवळ डमी उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार असून महायुतीचे ना. नारायण राणे विरुद्ध महविकास आघाडीचे विनायक राऊत यांच्यातच प्रमुख लढत रंगणार आहे.
लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १२ ते १९ एप्रिल ही मुदत होती. यामध्ये १२ तारखेला १, १६ ला २ आणि अंतिम दिवशी ६ असे एकूण ९ उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले. पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवार शकिल अब्दुल करीम सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तो छाननीनंतर वैध ठरवण्यात आला. १६ तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार उबाठाचे विद्यमान खासदार विनायक भाऊराव राऊत ३ अर्ज आणि काल पुन्हा एकदा १ असे ४ अर्ज दाखल केले होते. ते सर्व वैध ठरले आहेत. अमृत अनंत तांबडे यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. सैनिक समाज पक्षाचे उमेदवार सुरेश गोविंदराव शिंदे यांनी एक अर्ज दाखल केला. विनायक लवू राऊत यांनी अपक्ष म्हणून एक अर्ज दाखल केला. बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लहू आयरे यांचा एक अर्ज. वंचित आघाडीचे मारूती रामचंद्र जोशी यांनी एक अर्ज दाखल केला. महायुतीचे उमेदवार नारायण तातू राणे यांनी भाजपकडून २ अर्ज दाखल केले. बहुजन मुक्त पार्टीचे उमेदवार अशोक गंगाराम पवार यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला तर विनायक भाऊराव राऊत यांनी आणखी एक उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी एकूण ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांनी १३ उमेदवारी अर्ज दाखल केले.
छाननी प्रक्रियेत सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले. सोमवार २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सायंकाळी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा लढतीचे चित्र स्पष्ट होईल. असे असले तरी खरी लढत महायुतीचे ना. राणे विरुद्ध महविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यातच रंगणार आहे. पुढील काही दिवसांत प्रचाराला वेग येणार आहे.









