विद्यार्थी आधार व्हॅलिडमध्ये रत्नागिरीची बाजी

राज्यातील १२ जिल्ह्यांत समावेश ; ७ हजार ४५७ विद्यार्थी पात्र

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ७ हजार ४५७ विद्यार्थ्यांचा आधार व्हॅलिडेशन (प्रमाणीकरण) झाले असून, त्याचे आधार वैध ठरले आहे. विद्यार्थी आधार क्रमांकाचे ९५ टक्केपेक्षा अधिक काम मुदतीत पूर्ण करणाऱ्या पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने अभिनंदन पत्र पाठवले आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी कौतुक केले आहे; मात्र १२ लाख ३६ हजार ४८४ विद्यार्थ्यांचे आधार इनव्हॅलिड आहे. गंभीर म्हणजे ५ लाख १७ हजार २३२ विद्यार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांकच शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे नव्या सत्रातील गणवेशासह शालेय पोषण आहाराच्या निधीला कात्री लागण्याची आणि अनेक विद्यार्थी वंचित राहण्याची भिती आहे. राज्यातील २ कोटी १२ लाख ५५ हजार ३५ शालेय विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक आधार व्हॅलिडेशनसाठी ३० मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात १ कोटी ९४ लाख ६९ हजार २१५ विद्यार्थ्यांचेच आधार वैध ठरले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ७४५७ विद्यार्थ्यांचा समवेश आहे. राज्यातील १२ लाख ३६ हजार ४८४ विद्यार्थ्यांचे आधार इनव्हॅलिड आहे.

शैक्षणिक सत्रात ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या आधारची वैधता ३० मार्चपर्यंत युडायसवर पूर्ण करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण परिषदेने दिल्या होत्या. त्यात रत्नागिरीसह केवळ १२ जिल्ह्यांनी बाजी मारली. उर्वरित जिल्ह्यांना आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे; परंतु, विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पुरवल्यानंतर ज्यांचे व्हॅलिडेशन प्रलंबित आहे अशा विद्यार्थ्यांची संख्याही ३२ हजार ९५ इतकी प्रचंड आहे.