थिबा पॅलेसमध्ये ‘मल्टीमीडिया शो’ चे नवे दालन उभारण्याचा कामाला वेग

रत्नागिरी:- थिबा पॅलेसमध्ये मल्टीमीडिया शोचे नवे दालन सुरू करण्याच्या कामाने वेग घेतलेला आहे. या प्रकल्पाला पुरातत्त्व विभागाने तत्वत मान्यता दिल्यानंतर इमारतीसमोरील रिकाम्या सुमारे अडीच एकर जागेत मल्टीमीडिया शो साठी बांधकाम सुरू झालेले आहे. थिबा पॅलेसमध्ये मल्टिमीडिया शोचे राज्यातील पहिले नवे दालन लवकरच उदयास येणार आहे.

सुमारे आठ ते दहा कोटीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मल्टीमीडिया शो साठीचे बांधकामाला पारंभ झाला. येत्या निवडणूकीपूर्वी हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्यानंतर प्रत्यक्षात मल्टीमीडिया शो सुरू होईल, असे सांगण्यात आले. थिबापॅलेस हे ऐतिहासिक ठिकाण आहे. या इमारतीला हजारो पर्यटक भेट देऊन तेथील म्युझियमचा आनंद घेतात. पण आता थिबापॅलेस या नव्या शोमुळे चर्चेत येणार आहे.

पॅलेसच्या इमारतीसमोरील रिकाम्या जागेत मल्टीमीडिया शोचे सादरीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पाला पुरातन विभागाने तत्वत मान्यता दिली आहे. या प्रकल्पात थिबा पॅलेसचा दर्शनी भाग हा पडदा म्हणून वापरण्यात येणार आहे. मल्टिमीडिया शोमध्ये सात भारतरत्नांचा इतिहास, थिबापॅलेस, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास दाखवण्यात येणार आहे. अंदमानमध्ये अशा पद्धतीने मल्टीमीडिया शोचे सादरीकरण केले जाते. नागपुरातील फुटाळा येथे नागपूरचा इतिहास दाखवण्यात येतो. या धर्तीवर रत्नागिरीत मोकळ्या जागेवरती काळोखात अर्ध्या तासाचा हा शो सादर केला जाईल. रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे नवनवीन पकल्प मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष वेधलेले आहे. त्यातून अनेक संकल्पना पुढे आल्या आहेत.