रत्नागिरी:- मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचे सर्वेक्षण होणार असून मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे हे काम सोपवले आहे. या सर्वेक्षणासाठी गावागावात दवंडी देवून जागृती केली जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रविवारपासून शासकीय कर्मचार्यांना महसूल विभागामार्फत याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तालुक्यात नेमण्यात आलेले प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी जावून मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचे सर्वेक्षण करणार आहेत.
राज्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणासाठी सॉफ्टवेअर अॅप्लीकेशन वापरण्यात येणार आहे. हे सॉफ्टवेअर वापराबाबतचे प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांमार्फत सध्या आयोगामार्फत नेमण्यात आलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना देण्यात आले.
जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांना सहाय्य करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी हे सहाय्यक नोडल अधिकारी असतील. तर, तालुकास्तरावर तहसीलदार हे नोडल अधिकारी व नायब तहसीलदार हे सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
गाव पातळीवर प्रत्यक्षात आजपासून सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. प्रत्येक प्रगणक 100 कुटुंबांचे सर्व्हेक्षण करणार आहे. सर्व्हेक्षण झालेल्या घरांवर मार्कर पेनद्वारे चिन्हांकन करण्यात येणार आहे.
मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे कामे 31 जानेवारी या कालावधीत होणार आहेत. मराठा व बिगर मराठा खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण होणार आहे. याकामी गोखले इन्स्टिट्यूट पुणे व आयआयपीएस मुंबई या संस्थांची मदत होणार आहे.
आयोगाच्या सूचनेनुसार व कोकण विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय नियुक्ती पर्यवेक्षक व प्रगणकाकडून 23 ते 31 जानेवारी या कालावधीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होणार आहे. यासाठी 4 हजार 115 प्रगणक व 271 पर्यवेक्षक काम करणार आहेत.









