रत्नागिरी:- राज्याच्या सागरी क्षेत्रात आणि एलईडी प्रकाशात होणार्या मासेमारीवर कारवाई केली जात असल्याची माहिती शाश्वत मच्छीमार हक्क संघाच्या तालुकाध्यक्षांना सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकार्यांनी दिली. ज्या चार नौकांवर कारवाई झाली नसल्याची कुणकूण होती त्या चारही नौकांवर कारवाई झाली आहे. या नौकांविरुद्ध प्रतिवेदन दाखल करण्यात आले आहे. या कारवाईसंदर्भात सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांनाही माहिती दिली गेली आहे.
रत्नागिरीच्या समुद्रात 12 नॉटीकलच्या आत एलईडी प्रकाशात मासेमारी करणार्या चार नौका पकडण्यात आल्या. परंतू त्या नौका मालकांवर कोणतीच कारवाई झाली नसल्याचा संशय आल्याने शास्वत मच्छीमार हक्क संघाचे अध्यक्ष रणजीत भाटकर यांनी अवैध मासेमारी संदर्भात कारवाईची माहिती मागण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाईची माहिती मिळावी, यासाठी मच्छीमार हक्क संघाकडून सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाकडे अर्ज करण्यात आले आहेत. या संदर्भात त्या नौकांवर कारवाई झाली असल्याचे रणजीत भाटकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
जानेवारीपासून राज्याच्या जलधी क्षेत्रात म्हणजे 12 नॉटीकल मैलच्या आत समुद्रात पर्ससीननेट मासेमारी करण्यास बंदी आहे. त्यामुळे बहुसंख्य नौका 12 नॉटीकलच्या बाहेर केंद्रशासनाच्या समुद्रक्षेत्रात मासेमारी करण्यास जातात. एलईडी मासेमारी करण्यावरही बंदी आहे. एलईडी प्रकाशातील मासेमारीला पर्ससीननेट नौकांच्या संघटनांचा पूर्ण विरोध आहे. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकार्यांनी एलईडी मासेमारी करणार्या नौकांवर केलेल्या कारवाईची माहिती त्या विभागाच्या आयुक्तांनाही दोन दिवसांपूर्वीच सादर करण्यात आली आहे. त्या नौकांविरुद्ध प्रतिवेदन दाखल असून आता या प्रकरणाची सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. अशा अवैध मासेमारी करणार्या नौकांवर 5 लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाकडून अशा अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याने कारवाई होत नाही, हा संशय दूर होण्यास मदत झाली आहे.