रत्नागिरी:- विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान जिल्ह्यातील शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रति उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे.
आदर्श शाळा योजनेंतर्गत लहान व मोठी बांधकामे करणे या बाबीकडे लक्ष देण्यात आले असून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभियानाचा अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तीक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंड ओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास अशा अनेक विविध घटकांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
अशा महत्त्वपूर्ण घटकांना योग्य त्या प्रमाणात प्राधान्य दिल्यास शाळेचा सर्वांगीण विकास निश्चितपणे होऊ शकतो. या सर्व घटकांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या व्हावी, यासाठी शाळांनी आपापसात स्पर्धा करणे हा त्यासाठीचा सर्वोत्तम उपाय आहे. माझी शाळा सुंदर शाळा हे स्पर्धात्मक अभियान तीन स्तरावर राबवण्यात येत आहे. यासाठी तालुका, जिल्हा व विभागस्तरावर बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यासाठी लाखो रूपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
अभियानाचा कालावधी शिक्षण आयुक्तांनी नियुक्त केलेल्या दिनांकापासून 45 दिवसांचा राहणार आहे. अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणार्या शाळांना विद्यार्थी केंद्रीत उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग 60 गुण, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध
घटकांचा सहभाग 40 गुण असे मिळून 100 पैकी गुणांकन दिले जाणार
आहे.
या अभियानात जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.









