सर्वसामान्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकारांवर कठोर कारवाई करा: किरण सामंत

रत्नागिरी:- सावकारीमुळे सर्वसामान्य आणि गरजूंची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असल्याचे गंभीर प्रकार पुढे आले आहेत. रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत शहरामध्ये ही पिळवणुक योग्य नाही. त्यामुळे सामान्यांना त्रास देणाऱ्या किंवा त्यांची पिळवणुक करणाऱ्या सावकारांवर कठोर कारवाई केली जावी. त्यांची गय केली जाऊ नये, असा सूचना शिवसेनेचे नेते आणि उद्योजक किरण सामंत यांनी पोलिस दलाला केल्या आहेत.

गेल्या महिनाभरात रत्नागिरी शहर, परिसरात बेकायदेशीर सावकारीचे गंभीर प्रकार पुढे आले आहे. एक दोन नव्हे तर चौघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. अटकेच्या कारवाईनंतर या बेकायदेशीर सावकारांनी सामान्य आणि गरजू कर्जदारांची अक्षरशः पिळवणूक केल्याचे पुढे आले आहे. फणसोप येथील एका सावकाराने अवघ्या १५ हजारासाठी कर्जदाराचा पासर्पोर्ट काढुन घेतला. तसेच त्याचे १५ हजाराचे कर्ज सव्वा लाख झाल्याची नोटरी करून घेतल्याचे पुढे आले. त्यानतंर आर्थिक अडचणीत सापडलेल्या एक शासकीय नोकरदाराचीही मोठ्या प्रमाणात पिळवणुक झाली. दीड लाखाचे कर्ज चाळीस लाखावर गेल्याच कल्पनाच त्याला नव्हती. ब्लॉक नावावर करून घेण्याची वेळ आली. तेव्हा हा प्रकार पुढे आला. आता मिऱ्यावरील तर कीर नाम सावकाराने तर सीमा गाठली. २० हजाराच्या कर्जासाठी त्याने साडेसात एकर जमिनच नावावर करून घेतील. त्याने कर्जदारांकडून घेतलेले बॉण्ड, गाड्यांची कागदपत्रे गायब केली. मात्र त्याच्या मोबाईलमध्ये अनेक कर्जदारांच्या कागदपत्राच्या फोटोकॉपी असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह ‘व्हिडिओ क्लिप’ पोलिसांना आढळून आल्या आहेत. त्यांचा संबंध कर्जदारांशी आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर पडण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारामुळे सुसंस्कृत रत्नागिरीचे नाव बदनाम होत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते आणि उद्योजक किरण सामंत यांनी सामान्यांचा किरकोळ कर्जासाठी छळ आणि पिळवणूक करणाऱ्या सावकारांवर कठोर कारवाई करा, अशा सूचना पोलिस दलाला दिल्या आहेत.