केवळ ९ कृषी सहाय्यकांवर तालुक्याचा भार, ३९ पदे रिक्त

रत्नागिरी:- स्थानिक तरुणांची मानसिकता नसल्यामुळे परजिल्ह्यातील उमेदवार कृषी सहाय्यक पदासाठी भरती होऊन आपला कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी बदली करून घेतात. त्यामुळे येथील कृषी सहाय्यकांची पदे रिक्त होतात. त्यामुळे रत्नागिरी तालुका कार्यक्षेत्रामध्ये ४८ कृषी सहाय्यकांची गरज असताना केवळ नऊ कृषी सहाय्यक कार्यरत आहेत. त्यामुळे कृषी सहायकांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे.

रत्नागिरी तालुक्यामध्ये २०४ गावे असून, या तालुक्यांमध्ये मालगुंड, पावस, पाली व रत्नागिरी अशी चार मंडळ कार्यालये आहेत. या प्रत्येक मंडल कार्यालयामध्ये प्रत्येकी १२ म्हणजेच चार मंडळ मिळून ४८ कृषी सहाय्यक सध्या अपेक्षित आहेत. २०१६ मध्ये कृषी सहाय्यकांची भरती झाल्यानंतर या सर्व मंडळ कार्यालयामध्ये कृषी सहाय्यक भरण्यात आले. यात प्रामुख्याने आजपर्यंतचे चित्र पाहता स्थानिक तरुणांची मानसिकता नसल्याने व भरती झाल्यावर परजिल्ह्यात जाण्याची तयारी नसल्याने जिल्ह्यामध्ये भरल्या जाणाऱ्या कृषी सहाय्यक यांच्या भरतीमध्ये जिल्ह्याबाहेरील अनेक उमेदवारांचा समावेश असतो. हे उमेदवार सुरवातीला कमी पगारांमध्ये काम करण्याची तयारी ठेवून हंगामी कार्यकाल पूर्ण करतात. त्यानंतर आपल्या मुळ गावात, जिल्ह्यात बदली करून जातात. त्यामुळे दर पाच वर्षांनी कृषी सहाय्यकाची पदे रिक्त होतात. सध्या रत्नागिरी कार्यालयामध्ये ५ , पावसमध्ये २ , पालीमध्ये २ असे नऊ कृषी सहाय्यक कार्यरत आहेत. मालगुंडमध्ये एकही कृषी सहाय्यक नाही. त्यामुळे नऊ कृषी सहाय्यकांवर २२ गावांचा अतिरिक्त भार आहे. गेल्या महिन्यामध्ये भरतीची जाहिरात आली होती; परंतु त्याला स्थगिती आल्यामुळे सध्या तरी जागा रिक्त राहणार आहेत तसेच उर्वरित नऊपैकी काहीजण केव्हाही बदली करून जाऊ शकतात, अशी स्थिती आहे.