रत्नागिरी:- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला. प्रकृती अस्वस्थतामुळे राजीनामा दिला असल्याचे सुदेश मयेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मयेकर यांच्या राजीनाम्यामुळे मात्र राजकीय चर्चांना उधान आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीमागे ठाम उभे राहिले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऑगस्ट 2023मध्ये सुदेश मयेकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात तालुकाध्यक्षांची नव्याने नियुक्ती करुन चांगल्या पध्दतीने कामकाजाला सुरुवात केली होती.
जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वीच त्यांच्या ह्दयाची अॅन्जोप्लास्टी करण्यात आली होती. मागील दोन महिन्यांपासून सततच्या फिरतीमुळे त्यांना पुन्हा अस्वस्थता वाटू लागली होती. त्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी पदाचा राजिनामा देण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे पत्र आपण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवले असल्याचे सुदेश मयेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यापुढेही आपण राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत राहणार असल्याचे सांगतानाच, भविष्यात पक्षाने संधी दिल्यास आपण विधानसभेची निवडणूकही लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
2019मध्ये आपण राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी आपल्याला 31 हजारहून अधिक मते मतदार संघातील जनतेने दिली होती. रत्नागिरी शहर व तालुक्यात आजही आपण कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.









