रत्नागिरी:- आजाराला कंटाळून कोकण रेल्वेच्या संपर्कक्रांती एक्स्प्रेस मधून उत्तरप्रदेश येथील प्रौढाने रेल्वेतून झोकून देऊन आत्महत्या केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रामनरेश राममनोहर (वय ५५, रा. खानीहानी, जि. आजमगड उत्तरप्रदेश ) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २९) पावणेचारच्या सुमारास मिरजोळे-एआयडीसी येथील रेल्वे ट्रकवर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामनरेश हे गोवा येथून संपर्कक्रांती एक्स्प्रेसने प्रवास करत होते. त्याआधी दोन दिवस ते गोवा येथे काम करत होते. त्यांना पायाचे दुखणे होते. गोवा येथील डॉक्टरने त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांची मनस्थिती ठिक नव्हती. रेल्वेतून प्रवास करत असताना रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान मिरजोळे-एमआयडीसी येथील ट्रकवर त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबर मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार टेमकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
रामनरेश यांच्या खिशात डॉक्टरांनी दिलेली चिठी व डायरी सापडली. डॉक्टरांच्या चिठीवरच त्यांनी आत्महत्या करत असल्याचे नमुद केले होते. त्यांच्या डायरीत पोलिसांना मुलाचा मोबाईल नंबर होता. रामनरेश व त्याचा मुलगा हा गोव्यातच मजूरीचे काम करत होता. तत्काळ पोलिसांनी रामनरेश यांच्या मुलाला फोन करुन बोलवून घेतले. रामनरेश व त्याचा मुलगा हा गोव्यातच मजूरीचे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर रामनरेश यांचे रत्नागिरीतील चर्मालय येथे अंत्यविधी केला. अस्थिकलश घेऊन त्यांचे नातेवाईक उत्तरप्रदेश येथे रवाना झाले.