रत्नागिरी:- नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेला पाऊस आणि गेले चार दिवस ढगाळ वातावरण, हलका पाऊस पडल्यामुळे हापूसच्या झाडांवरील पालवी आणि मोहोरावर तुडतुड्यासह किड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागायतदारांना औषध फवारणी करावी लागत आहे.
हंगामाच्या सुरुवातीलाच वातावरण बदलल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा झाडांवर त्याचा विपरित परिणाम दिसू लागला आहे. गतवर्षी मोहोर न आलेली झाडे चांगल्या प्रकारे मोहोरू लागली असून काही ठिकाणी कणीही दिसू लागली आहे. पालवी फुटलेल्या झाडांनाही मोहोर जानेवारीपर्यंत येईल ी स्थिती आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंबा हंगामाचे चित्र समाधानकारक राहिल अशी स्थिती सध्या वर्तवली जात आहे: परंतु गेल्या चार दिवसात ढगाळ वातावरण असल्यामुळे आंबा बागांवर त्याचा परिणाम झालेला आहे. पालवीसह माहोरावर मोठ्याप्रमाणात तुडतुडे आणि किड रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. अपेक्षित थंडी पडत नसल्याने पालवी जुन होण्यास थोडा विलंब होऊ शकतो, असे बागायतदारांचे मत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागायतदारांकडून औषध फवारण्या केल्या जात असल्या तरीही ढगाळ वातावरण असेच राहिले तर आलेला मोहोर तुडतुड्यामुळे सुखून गळून जाईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. सध्या कामगारांच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यात बागायतींवर फवारणीला विलंब होत आहे.