शिक्षक भरतीत जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा बॅकलॉग भरून निघणार

80 टक्के रिक्त पदे भरण्यास हिरवा कंदील

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरतीसाठी प्रशासन सज्ज आहे. विभागिय आयुक्त पातळीवरून रोस्टर तपासून झाले आहे. जिल्ह्यातील एकुण पदांपैकी 80 टक्के रिक्त पदे भरण्यास हिरवा कंदिलही मिळाला आहे; मात्र राज्यातील पाच ते सहा जिल्ह्यातील ऑनलाईन नोंदणीला विलंब झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया रखडली आहे. या भरतीमुळे सुमारे साडेचौदोशहून अधिक प्राथमिक शिक्षकांची पदे भरली जातील असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

मागील काही वर्षात शिक्षक भरती न झाल्यामुळे दरवर्षी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे वाढतच आहेत. गतवर्षी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्यानंतर राज्यभरातून लोकांमध्ये सरकारविषयी नकारात्मक भुमिका तयार होऊ लागली. रत्नागिरी जिल्हापरिषदेतील रिक्त पदांची संख्या दोन हजारावर पोचली होती. त्यामुळे विरोधकांकडूनही हल्लाबोल केला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हापरिषद प्रशासनाने मानधन तत्वावर शिक्षक नेमले. त्यानंतर राज्यस्तरावरूनच नियमित रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षणविभागाकडून कार्यवाही सुरु झाली. शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर ऑनलाईन भरावयाची होती. त्यानंतर विभागिय आयुक्तांकडून रोस्टर तपासून रिक्त पदे निश्‍चित करून घ्यावयाची होती. ही प्रक्रिया ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते; परंतु अजुनही राज्यातील सुमारे सहा जिल्ह्यांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केलेली नाही. रत्नागिरी जिल्हापरिषदेची रोस्टर तपासणी आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडून करून घेण्यात आली आहे. जिल्ह्यात 1 हजार 766 मराठी तर 147 उर्दू माध्यमातील शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एकुण रिक्त पदांपैकी 80 टक्के पदे भरण्यास मान्यताही दिली गेली आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलवर भरण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्याला सुमारे साडेचौदाशे नवीन शिक्षक मिळणार आहेत. ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी रत्नागिरी जिल्हापरिषद प्रशासन सज्ज असले तरीही अन्य जिल्ह्यांची माहितीला विलंब होत आहे. भरतीची प्रक्रिया राज्यात एकाचवेळी केली जाणार असल्याने आणखीन दोन महिने जाहिरात प्रसिध्द होण्यासाठी लागतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.