रत्नागिरी:- दरमहा किमान वेतन, ऑनलाईन कामाची सक्ती नको, दिवाळी व भाऊबीज भेटीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तक यांनी बुधवारपासूर बेमुदत कामबंद संप सुरू केला आहे. सलग सहाव्या दिवशी हा संप सुरूच असून, ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेवर थोड्याफार प्रमाणात परिणाम जाणवू लागला आहे.
गेली अनेक वर्षे आशा व गटप्रवर्तक महिला आपल्या विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करत आहेत. पुन्हा एकदा मागण्यांसाठी एल्गार केला आहे. 17 ऑक्टोबरला जिल्हा परिषदेवर मोर्चा काढत 18 ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद संप करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार हा संप सुरू झाला आहे. सोमवारी यावर तोडगा न निघाल्यामुळे सलग सहा दिवस हा संप सुरूच आहे. याचा परिणाम थोड्याफार प्रमाणात ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर जाणवू लागला आहे.
आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा 26 हजार रुपये किमान वेतन, गटप्रवर्तक महिलांना दरमहा 8 हजार 450 रुपये स्वतंत्र प्रवास भत्ता, ऑनलाईन कामाची सक्ती करणे बंद करा, दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना किमान पाच हजार रुपये दिवाळी भाऊबीज द्या, अशा प्रमुख मागण्या आहेत.









