रत्नागिरी:- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत दि. 3 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2023 पर्यंत सक्रीय क्षयरोग शोध मोहीम राष्ट्रीय कुष्ठरोग निमूर्लन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती जिल्हा क्षयरोग अधिकरी डॉ. महेंद्र गावडे यांनी दिली.
राज्यातील क्षयरुग्णांचे निदान लवकरात लवकर होवून त्यांना त्वरित औषधोपचाराखाली आणण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
रोगशास्त्रीय अभ्यासानुसार वरील दोन्ही आजारांचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगांपासून निर्माण होणार्या गुंतागुंतीचा सामना तर करावा लागतो त्याच प्रमाणे त्याच्या सहवासातील इतर निरोगी लोकांना रोगाची लागण होण्याचा धोका संभवतो व संसर्गाची साखळी अखंडीत रहाते.
या कालावधीत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत सक्रीय क्षयरोग शोध मोहीमे अंतर्गत तपासणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाने सन 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करावयाचे लक्ष निर्धारित केले आहे.
जिल्ह्यांतर्गत जोखीमग्रस्त भागात आशा स्वयंसेविका व प्रशिक्षीत पुरुष स्वयंसेवकामार्फत एकूण 74 आरोग्य पथके व एकूण 15 सुपरवायझर यांच्या निरिक्षणाखाली कार्यक्षेत्रातील स्त्रियांची व पुरुषांची क्षयरोग लक्षणांबाबत तपासणी करण्यात येत आहे.
दिनांक 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत 32304 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामधील 1001 संशयीत रुग्ण सापडले असून, त्यापैकी आजपर्यत 11 क्षयरुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकरी डॉ. महेंद्र गावडे यांनी दिली.