जिल्ह्यातील नमन कलावंतांना न्याय मिळवून द्या

नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संघटनेच्यावतीने ना. सामंत यांच्याकडे मागणी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात लोककलेत मानाचे स्थान आणि मोठा जनाधार असलेल्या नमन लोककलावंतांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. या मागण्यांसाठी शासन दरबारी पूर्तता करून जिल्ह्यातील नमन कलावंतांना न्याय मिळवून देण्याची आग्रही मागणी नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर असलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांची शुक्रवारी नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या तालुका शाखेच्या शिष्टमंडळाच्यावतीने पाली येथील निवासस्थानी भेट घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर (पी.टी.) कांबळे, सोबतच जिल्हा संघटनेतील ज्येष्ठ सदस्य श्रीधर खापरे, सुरेश होरंबे, हरिश्चंद्र बंडबे, विश्वनाथ गावडे, तालुका संघटना सदस्य वसंत साळवी, श्रीकांत बोंबले आदी उपस्थित होते.

‘नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संघटनेने नमन आणि जाखडी ह्या लोककलांना राज्य शासनाने मान्यता द्यावी, या कलेला राजाश्रय मिळावा अशा आशयाची मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे नमन लोककला रत्नागिरी संघटनेच्यावतीने यापूर्वी करण्यात आली होती. त्या मागणीची तात्काळ दखल मुख्यमंत्र्यांनी उदय सामंत ह्यांच्या विनंतीनुसार ती मागणी तात्काळ मान्य केली. त्यामुळे या कलावंताच्या समस्या पूर्ततेसाठी संघटनेने वारंवार केलेल्या पाठपुराव्याची दखल पालकमंत्री उदय सामंत यांनी वेळोवेळी घेतली आहे, तसेच त्यासाठी सहकार्य राहिले असल्याचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

त्यामुळेच जिल्ह्यातील नमन कलावंतांच्या आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या मागण्या पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे मार्गी लागल्या आहेत. त्यामुळे या कलावंताना शासनाकडून मोठा दिलासा लाभला आहे. नुकतेच रत्नागिरी तालुक्यातील ज्येष्ठ नमन कलावंतांचे 54 मानधन प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाले. पालकमंत्री सामंत यांच्या सहकार्यामुळेच या ज्येष्ठ कलावंताना पेन्शनच्या रुपाने आर्थिक सहाय्य मिळू लागले आहे. पण हे मानधन प्रस्ताव मंजूर होत असताना यापुढे रत्नागिरी जिल्ह्यातून असलेली ज्येष्ठ कलावंताची 100 ची मर्यादा 500 इतकी केली जावी अशी मागणी आहे.

त्याचबरोबर पन्नास वर्षापेक्षा अधिक वय असलेला कलावंतांना शासनाच्या पेन्शन योजनेच्या लाभासाठी महत्वाची मागणी करताना कलावंतांना कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 48000 रु. इतकी असलेली मर्यादा 1 लाखापर्यंत केली जावी. जे मानधन अ, ब, क श्रेणीनुसार 2250 ते 3150 रु. दिले जाते, त्यात वाढ करून किमान 5 ते 10 हजार रु. इ.केले जावे. मागील कोव्हीड काळात जिल्ह्यातून 192 पस्ताव मंजूर झालेले होते. अजूनही रत्नागिरी, संगमेश्वर व राजापूर या तालुक्यातील नमन कलावंतांचे 340 प्रस्ताव उशिरा पोहचल्यामुळे मंजूरीच्या पतिक्षेत आहेत. ते प्रस्ताव शासनाकडून तातडीने मंजुर केले जावेत. त्याचबरोबर राज्य शासनाकडून नवनवीन लागू होणार्‍या योजनांचे परिपत्रक जिल्हा संघटनेला देखील मिळावे अशा मागण्याचे निवेदन पालकमंत्री उदय सामंत यांना देण्यात आले आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन सामंत यांनी शिष्टमंडळाला दिले.