कुष्ठरुग्ण संख्या शून्यावर आणण्यासाठी जिल्ह्याचा धोरणात्मक कृती आराखडा

रत्नागिरी:- सन 2023-2027 या कालावधीत कुष्ठरुग्ण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट शासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. यासाठी जिल्हा धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याचे विमोचन सोहळा जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंग यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला.

विविध स्तरावर शून्य कुष्ठ रुग्ण गाव, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका, जिल्हा कुष्ठमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गांधी जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या नियोजित कार्यक्रमाचा कुष्ठ रोगाबद्दल शून्य कुष्ठरुग्ण संसर्गाचा सन 2023-2027 चा जिल्हा धोरणात्मक कृती आराखड्याचा विमोचन सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांसह जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, आरोग्य अधिकारी डॉ.अनिरूद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

आशा, सामुदायिक अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्या नियमित भेटी, कुष्ठरोग विषयक सर्वेक्षण व तपासणी करणे, सांसर्गिक रुग्ण, बालरुग्ण, विकृती रुग्ण, परिसर सर्वेक्षण करणे आणि संसर्गाची साखळी खंडित करणे, कुष्ठ रुग्णांच्या सहवासीतांची तपासणी करणे, जोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करणे, आरोग्य शिक्षणातून जनजागृती करणे, शालेय विद्यार्थ्यांची आरबीएसके पथकाकडून तपासणी करणे आदी या आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.