रत्नागिरी:- मागील चौवीस तासापासून जोरदार गार वार्यासह कोसळणार्या पावसाने जिल्ह्याला रत्नागिरीला झोडपून काढले आहे. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटात रस्त्यावर दरड व माती आल्याने सुमारे दीड तासाहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रत्नागिरी तालुकासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात नद्या, नाले पुन्हा दुथडी भरुन वाहत असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे.
रत्नागिरीला मागील चौवीस तासात पावसाने झोडपून काढले आहे. गार वार्यासह कोसळणार्या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. दिवसभर थांबूनथांबून जोरदार कोसळणार्या पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात दत्त मंदिर जवळ दरड व माती पाण्यामुळे रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद पडली होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मोठ्याप्रमाणात चिखलाचे पाणी रस्त्यावरुन वाहत होते. या पाण्याबरोबर आलेल्या दगडांमुळे अनेक वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. महामार्ग बंद झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर महामार्ग वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून बांधकाम विभागाला याची माहिती देण्यात आली.
पालकमंत्री उदय सामंत यांना याची माहिती मिळताच, त्यांनी तातडीने शिवसेना तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप यांना माहिती दिली. त्यांनी लागलीच आपले पदाधिकार्यांसह जेसीबी मशिन घटनास्थळी पाठवून दिले. त्यानंतर जवळपास एक तासभर माती व दगडी उपसण्याचे काम सुरु होते. स्वत: बाबू म्हाप घटनास्थळी उभे राहून सूचना देत होते. यावेळी महसूलचे अधिकारीही उपस्थित होते. सुमारे दीड ते दोन तास रस्त्यावर आलेली माती व दरड काढण्यात आली. त्यामुळे सुमारे दोन तासांनी महामार्ग सुरळीत झाला.