पावसात निपचित पडलेल्या व्यक्तीला केले रुग्णालयात दाखल
रत्नागिरी:- आपल्या आजूबाजूला वावरत असताना अनेक गोष्टी नजरेस येतात, कुणी दुर्लक्ष करून पुढे जाते तर कुणी त्याविषयी सजगता दाखवते, शहानिशा करून एखाद्याला मदतीचा हात पुढे करते…अशीच एक घटना शहरात मुसळधार पावसात समोर आली. जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्याच्या फुटपाथवर प्लास्टीक कागदाखाली झाकलेल्या अवस्थेत एक अनोळखी व्यक्ती निपचित पडलेला होता. त्याला येथील पोलीस कर्मचारी प्रशांत बोरकर यांनी रुग्णालयात दाखल करून त्याच्यावरील उपचारांसाठी दाखलेल्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रत्नागिरीत रविवारी सकाळी प्रशासनाच्यावतीने स्वच्छता अभियान असल्याने पोलीस कर्मचारी प्रशांत बोरकर हे लवकर आलेले होते. सिव्हील हॉस्पिटल इथून चालत जात असताना रस्त्याच्या फुटपाथवर प्लास्टिक मध्ये काहीतरी झाकलेले त्यांच्या नरजेस पडलं. त्यांनी जवळ जाउन काय आहे याची खात्री करण्यासाठी सहज बघितले. असता त्याच्या खाली एक व्यक्ती झोपलेला त्यांना दिसला. पाऊस भरपूर पडत होता. त्यामुळे त्या मुसळधार पावसात हा माणूस काय करतो म्हणून त्यांनी त्याची खातरजमा केली. त्या व्यक्तीचे दोन्ही गंभीर जखमा झालेल्या अवस्थेत होता. तसेच तो घाबरला असून अक्षरशः थरथर कापत असल्याचे बघितल्यावर बोरकर यांच्या अंगावर काटा उभा राहिला.
बोरकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता समोरच असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. परंतु आतापर्यंत त्याला का नाही कोणी रुग्णालयात ॲडमिट केले नाही असा प्रश्न बोरकर यांना पडला. लगेचच जिल्हा शासकीय रुग्णालयात जाउन तेथे अपघात विभागात ड्युटीवर असलेल्या कर्मचार्यांना मदतीसाठी विनंती केली. त्यावेळी कर्मचार्यांनीही कोणतीही आडेवेडे न घेता लगेचच बोरकर यांच्यासोबत त्या अनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी यायला तयारी दर्शवली. व्हील चेअर घेऊन रुग्णालयातले दादा वॉर्डबॉय मोहिते बोरकर यांच्यासोबत रस्त्यावर आले. जवळपास अन्य कुणीही माणूसही मदतीला नव्हता. अशावेळी बोरकर व मोहिते या दोघांनी फुटपाथवर असलेल्या त्या अनोळखीला जिल्हा रुग्णालयात आणून उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे त्या व्यक्तींवर जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांमार्फत वेळीच उपचार सुरू होण्यास मोलाची मदत झाली. पण पोलीस कर्मचारी प्रशांत बोरकर यांच्या सजगतेमुळे भर पावसात फुटपाथवर निपचित पडलेल्या त्या व्यक्तीच्या जीवावर बेतणारा पुढील प्रसंग टाळण्यास मोलाची मदत झाली.