चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा निर्मितीचे नियोजन

रत्नागिरी:- यंदा पावसाचा जोर कमी असला तरीही कोकणात चारापिकांचा प्रश्‍न गंभीर होईल अशी परिस्थिती नाही. मात्र शासनाकडून राज्यभरात चारा कमी पडू नये यासाठी उपाययोजनांवर भर दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पशुपालकांना चारा निर्मितीसाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन आणि कृषी विभागाकडून प्रोत्साहित केले जात आहे. पहिल्या टप्प्यात नेपिअर गवताची लागवड करण्यात आली असून मका, चवळी आणि शुगर ग्रेस लागवडीसाठी 15 लाखाचे बियाणे लवकरच वितरित केले जाणार आहे.

राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून सप्टेंबर महिन्यात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोकणात तुलनेत परिस्थिती चांगली असली तरीही भात पिकांवर कमी पावसाचा परिणाम होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दुग्धोत्पादन कमी प्रमाणात केले जाते. यांत्रिकीकरणावर अधिक भर दिला जात असल्याने गाय, बैल, म्हशींची संख्या घटली आहे. परंतु उपलब्ध जनावरांना लागणार्‍या चार्‍याचा प्रश्‍न गंभीर होऊ नये यासाठी जिल्हा परिषद पशुधन विकास विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. महिन्याभरापूर्वी नेपिअर गवताचे ठोंबे प्रत्येक तालुक्याला जनावरांच्या संख्येनुसार वितरित केले आहेत. ते गवत महिनाभरात कापणीयोग्य होणार आहे. ज्या पशुपालकांकडून अधिकची जनावरे आहेत, त्यांना नेपिअर गवत उपयुक्त ठरू शकते. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2815 मिमी पाऊस झाला आहे. सध्यातरी हिरवा चारा जनावरांसाठी उपलब्ध आहे. तरीही नेपिअर गवताची लागवडीला प्रशासनाकडून प्रोत्साहन दिले गेले आहे. पशू दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रातील पशूपालकांना हे ठोंबे लागवडीसाठी दिले आहेत. जिल्ह्यात 5 हजार ठोंब्यांचे वितरण केले आहे. भविष्यात चार्‍याची गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी मका, चवळी आणि शुगर ग्रेसच्या बियाण्यांचे तालुकानिहाय वाटप केले जाणार आहे. जिल्हा परिषद पशुविभागाकडून याचे नियोजन केलेले आहे. जिल्हा नियोजन विभागाकडून 15 लाखाचा निधी मिळणार आहे.