महामार्ग वाहतुक पोलिसांचे चाकरमान्यांसाठी चोख नियोजन

रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणार्‍या चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना त्रास होऊ नये म्हणून महामार्ग वाहतुक पोलीस जिल्ह्यातील महामार्गावर २४ तास तैनात करण्यात आले आहेत त्यामूळे वाहतुक कोंडी कमी होत आहे. महामार्गाचे अपूर्ण कामामुळे वाहतुक कोंडी होत असल्याने पोलिसांची ती सोडविताना कसोटी लागत आहे तरीही ते वाहतुक सुरळीत ठेवत आहेत.

याबाबत महामार्ग वाहतुक पोलीस रत्नागिरी विभागाच्या पोलीस निरीक्षक रेश्मा कुंभार यांनी सांगितले की, रत्नागिरी विभागातील मुंबई गोवा महामार्गाची पोलादपूर (जि. रायगड) ते खारेपाठन (जि.सिंधुदुर्ग) अशी २७३ किलोमीटर अंतराची हद्दी रत्नागिरी विभागा अंतर्गत येते त्यामध्ये असणार्‍या तीन महामार्ग वाहतुक पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून,पेंडॉल बंदोबस्त व सुरक्षा गस्त करण्यात येत आहे. याकरिता महामार्ग वाहतुक पोलीस मदत केंद्र कशेडी २८, चिपळूण ४३, हातखंबा ३८ असे १०९ नियमित व बाहेरील अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

यामध्ये आज महामार्गावर चाकरमान्यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने व
महामार्ग चौपदरीकरण प्रलंबित कामामुळे होणारी वाहतुक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.तसेच पोलिसांची नजर चुकवून महामार्गावर बंदी असतानाही अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने त्यावर कारवाई करून थांबविण्यात आले आहे. शिवाय महामार्गावर असणार्‍या बाजारपेठांमध्ये ग्राहकांच्या वाहनाची होणारी गर्दी कमी करून वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात येत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कमी त्रासात सुलभ प्रवास करता येतो आहे.