रत्नागिरीत मिऱ्या- नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेली १३ वर्षे रखडले असताना मिऱ्या-नागपूर या रत्नागिरी शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम वेगाने आणि युद्धपातळीवर सुरू आहे. परटवणे ते साळवी स्टॉप भागात रस्त्याच्या एका बाजूचे सपाटीकरण पुर्ण होत आले आहे. रवी इन्फ्रा कंपनीच्या या कामाचे कौतुक होत आहे.
मिऱ्या-नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत ठेकेदार कंपनीचे कौतुक होत आहे. रत्नागिरी, कुवारबाव, खेडशी, हातखंबा, पालीपासून पुढे साखरपापर्यंतच भूसंपादन रत्नागिरी प्रांताधिकाऱ्यांकडे आहे.

भूसंपादनाची बहुतेक प्रक्रिया पुर्ण झाली असून कुवारबाव व अन्य काही गावांमध्ये फ्लाय ओव्ह की बायपास काढायचा यावरुन मतमतांतर आहे. त्यामुळे काही ठिकाणी भूसंपादनाचे पैसे वाटप झालेले नाहीत. परंतु ज्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे, मोबदला दिलेल्या साखरपा ते पाली पर्यंत चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. वेगाने काम झाल्याने मुंबई-गोवा महामार्गापूर्वी मिऱ्या-नागपूर रस्त्याचे काम पुर्ण होईल, अशी अनेकांची अपेक्षा आहे.

मिऱ्यापासून या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. परंतु सध्या परटवणे येथून कामाला वेगाने सुरवात झाली आहे. चौपदरीकरणासाठी ठेकेदार कंपनीने एका बाजूने रस्त्यालगत सपाटीकरण केले आहे. एक बाजू
जवळजवळ सपाटीकरणाचे काम पुर्ण होत आले आहे. फिनोलेक्स कॉलनीपासून नर्मदा सिमेट, चंपक मैदान ते साळवी स्टापपर्यंत रवी इन्फ्रा कंपनीने चौपदरीकरणाच्या कामाला गती दिली आहे. काही ठिकाणी बेकायदेशीर बांधकामांचा विषय आहे, त्यावरही लवकरच तोडगा निघणार आहे. परंतु रस्त्यात येणारी अनधिकृत बांधकामे कंपनीकडुन जमिनदोस्त केली जात आहेत.