मिर्‍या येथे अडकलेल्या स्टार बसरा जहाज मोडतोड करून समुद्राबाहेर काढणार

रत्नागिरी:- मिर्‍या बंदर येथे समुद्रात भरकटत आलेले स्टार बसरा जहाज पावसाळ्यापूर्वी तेथून हटवता आले नाही. परदेशी जहाज भंगारात काढून ते तेथून पूर्णपणे काढून घेण्याबाबत शासकीय कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने ते जहाज आहे तेथेच आहे. आता शासकीय कागदपत्रांची पूर्तता होत आल्याने दिवाळीपूर्वी त्या जहाजाचे एक-एक भाग काढून घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

शारजा या आखाती देशातील स्टार बसरा हे टँक जहाज 3 जून 2020 साली वादळी वारा आणि लाटांच्या वार्‍यामुळे मिर्‍या समुद्र किनारी भरकटत आले. निसर्ग वादळाचा धोका असल्याने हे खोल समुद्रातील जहाज भगवती बंदर येथे आश्रयाला आले.
नांगर टाकून उभे केलेले हे जहाज वारा आणि लाटांच्या तडाख्याने नांगर तोडून मिर्‍या येथील बंधार्‍याच्या क्वॉरीत अडकून पडले. हे जहाज अखेर भंगारात काढण्यात आले. त्यानंतर या जहाजाचे एक-एक भाग काढून घेण्यासाठी शासकीय पातळीवर कार्यवाही सुरू झाली.

रत्नागिरीतील एका भंगार व्यावसायिकाने हे जहाज घेतले असून त्याची विल्हेवाट लावण्याबाबत शासनाच्या विविध विभागांकडे कार्यवाही सुरू केली. त्यानंतर कोरोना संकटकाळातील दोन वर्ष वाया गेली. कोरोनाचा धोका संपल्यानंतर पुन्हा शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले. पावसाळ्यापूर्वीच हे जहाज बंधार्‍यातून काढून ते भंगारात जाईल, अशी आशा होती. परंतु अंतिम कागदपत्रांची पूर्तता होवू शकली नाही. ही पूर्तता आता अंतिम टप्प्यात असून दिवाळीपूर्वी हे जहाज तेथून काढले जाण्याची शक्यता आहे.