खेड:- जगबुडी नदीच्या रेलींगवर उभे राहून एक तरुणी आत्महत्या करत होती. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाने तिला पाहीले. त्यानंतर तात्काळ शिताफीने रेलींगवरून ओढून सुरक्षित ठिकाणी आणून आत्महत्या करण्यापासून पोलीसांनी तिला परावृत्त केले.घरगुती कारणामुळे घाबरून त्यापासून सुटका होण्यासाठी ही तरुणी आत्महत्या करत होती.
रत्नागिरी जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेच्या सांगता समारंभासाठी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर व त्यांचे पोलीस पथक रत्नागिरीकडे निघाले होते. त्याचवेळी भरणे नदीच्या पुलावर एक तरुणी उभी राहून जगबुडी नदीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहताच पोलिसांनी आपली गाडी वेगाने तिच्याजवळ नेऊन थांबवली. तात्काळ सर्व पोलीस गाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी शिताफीने त्या तरुणीला रेलींगवरून खाली ओढले. तिला सुरक्षित ठिकाणी नेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर आणि पोलीस पथकाने तिता विश्वासात घेऊन तिचे समुपदेशन केले. तिच्या समस्येबाबत विचारपूस केली, त्यावेळी घरगुती कारणातून घाबरून त्यापासून सुटका होण्यासाठी नदीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा विचार त्या तरुणीने केला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या तरुणीचे प्राण वाचवण्यात उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर, पोलीस कॉन्स्टेबल बांगर आणि लतिका मोरे यांनी महत्वाची भुमिका बजावली. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकणी यांनी या सर्व पोलीसांचे कौतुक केले आहे.









