रत्नागिरी:- नातेवाईकांनी नाकारल्याने बेवारसाप्रमाणे मृत्यू झालेल्या ४० जणांवर वर्षभरात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार करत मृतदेह दफन केले. ना अंतिम दर्शन घेणारे कोणी, ना कोण्याच्या डोळ्यात पाणी, नातेवाईकांनी झिडकारलेल्या या चाळीसजणांची अशी बेवारस अखेर झाली आहे.
काही वेळा आपल्यांनी नाकारलेल्या मनोरुग्णाचा रस्त्यावर उपचारादरम्यान मृत्यू होतो. त्याचे शवही जवळच्या शासकीय रुग्णालयाच्या शवागारात दाखल केले जाते. काहीवेळा अनोळखी रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. अशांचा उपचारादरम्यान मृत्यू होतो. अपघात किंवा अन्य ठिकाणी मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटेपर्यंत त्याला शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवले जाते; मात्र, सात दिवसांपर्यंत त्याची ओळख पटली नाही किंवा त्याचे नातेवाईक आले नाहीत तर जिल्हा रुग्णालय, पोलिस आणि रत्नागिरी पालिकेमार्फत तो मृतदेह दफन केला जातो. तत्पूर्वी त्याचे नातेवाईक आल्यास त्याची डीएनए चाचणी करून मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जातो; परंतु क्वचित अशा घटना घडल्या आहेत तसेच मृतदेह दफन केल्यानंतरही काहीवेळा नातेवाईक आले आहेत. दफन केलेला मृतदेह काढून परत नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचा प्रकारही काही वर्षांपूर्वी झाला होता. बेवारसांमध्ये वयोवृद्ध, व्यसनाधीन आदींचा समावेश आहे. नातेवाईक अशांना नाकारतात आणि बेवारस मृत्यू त्यांच्या वाट्याला येतो.
याबाबत पालिकेकडून माहिती घेतली असता वर्ष ते दीड वर्षांमध्ये पालिकेने ४० बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून दफन केल्याची माहिती सांगितली. जिल्हा शासकीय रुग्णालयात आलेल्या बेवारसांबाबत पालिकेला पत्र येते. त्यानंतर पालिकेचे कर्मचारी हा मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर परंपरागत अंत्यसंस्कार करून हा मृतदेह दफन केला जातो. बेवारस मृतदेह असल्याने कधीही याबाबत तक्रार येण्याची किंवा नातेवाईक निष्पन्न होण्याची शक्यता असल्याने बेवारस मृतदेह दफन केले जातात. बेवारस मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची सात दिवसांपर्यंत प्रतीक्षा केली जाते. त्यानंतर त्या मृतदेहाचा फोटो काढून त्याचे कपडे पुरावा किंवा ओळखीसाठी ठेवले जातात.









