उपजिल्हाधिकारी कांबळे ; पाककला स्पर्धेत प्रज्ञा फडके प्रथम
रत्नागिरी:- एकूण उत्पादनाच्या 65 टक्के उत्पादन कृषीचे आहे. कृषीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आयात-निर्यात केली जाते. भारत हा कृषिप्रधान देश असून अनेक प्रयोगशील शेतकरी व्यावसायिक शेती करू लागले आहेत. जिल्ह्यातील लाल मातीतही विविध पिके घेण्यात येत असून अनेक महिला शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतीकडे वळल्या आहेत. शेतीमाल उत्पादन व विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळवत सक्षम बनल्या आहेत. या महिलांची प्रगती अन्य महिला शेतकर्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी निशाताई कांबळे यांनी केले.
रत्नागिरी कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मा, रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ, नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास कार्यक्रम, लोकसंचलित साधनकेंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुर्हाडे, शिरगांव भात संशोधन केंद्राचे अधिकारी डॉ. विजय दळवी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्येचे कृषी विद्यावेत्ता डॉ. किरण माळशे, नाबार्डचे मंगेश कुलकर्णी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी अमरीश मेस्त्री, जिल्हा संसाधन व्यक्ती अमोल कांबळे, जलजीविका कार्यक्रम अधिकारी अंकिता पाटील उपस्थित होते.
जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश सांगितला तर सुनंदा कुर्हाडे यांनी रानभाज्यांचे महत्व सांगून त्यातील पौष्टिक गुणधर्मामुळे आहारात समावेश करावा. कमी खर्चात, नैसर्गिक उगवणार्या, विषमुक्त भाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. रानभाज्या महोत्सवानिमित्त पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रज्ञा फडके (परांकी), संकिता बने (टाकळा भाजी), तृतीय क्रमांक सुलभा भणसळकर (फोडशीची वडी) यांनी मिळवला. स्पर्धेचे परीक्षण मेघना शेलार यांनी केले. सूत्रसंचलन दीपक काळे यांनी केले. ग्रामीण भागातील महिलांनी विविध रानभाज्या स्पर्धेत मांडल्या होत्या.









