किरण सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामांना प्रारंभ
रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरण व रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा शुभारंभ मंगळवारी सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
कोकण रेल्वे मार्गावरील 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरण व काँक्रीटीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने सह्याद्री अतिथीगृह येथून करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह बांधकामचे अधिकारी व कोकण रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
बारा स्थानकांमध्ये रत्नागिरीमधील राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण व खेड रेल्वेस्थानकांचा समावेश असून सिंधुदूर्गमधील चार तर रायगडमधील तीन रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. तब्बल 56 कोटी रुपये खर्च करुन कोकणातील रेल्वेस्थानकांना नवीन साज चढवण्यात येत आहे. या सर्व रेल्वेस्थानकांवर मंत्री, स्थानिक आमदार, माजी आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते त्या-त्या रेल्वेस्थानकातील कामांचे श्रीफळ वाढवण्यात आले.
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राहूल पंडीत, महिला जिल्हाध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. ऐश्वर्या जठार, बाबू म्हाप, यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रविंद्र कांबळे, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता सौ. छाया नाईक, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, उपविभागीय अधिकारी जनक धोत्रेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









