जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी पुन्हा आक्रमक; 9 ऑगस्टला महाबाईक रॅली

रत्नागिरी:- देशभरात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी विविध आंदोलने होत असताना रत्नागिरी जिह्यामध्ये देखील शासनाच्या कर्मचारी मार्ग धोरणांचा जाहीर निषेध करण्यासाठी तसेच अन्य महत्वाच्या मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. 9 ऑगस्ट रोजी काढण्यात येणार्‍या महाबाईक रॅलीमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे अध्यक्ष दिनेश सिनकर यांनी सांगितले आहे.

राज्यतील सर्व कर्मचार्‍यांना सन 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. यासाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करून हा प्रश्न सत्वर निकाली काढण्यासाठी बुधवार 9 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये ही महाबाईक रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून प्रमुख 7 मागण्यांसाठी कामगार कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून शासकीय सेवेत प्रविष्ट झालेल्या सर्व कर्मचायांचा सर्वात जिव्हाळयाचा व महत्वाचा प्रश्न म्हणजे नवीन पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करण्याचा आहे. देशभरातील कर्मचारी संघटनांच्या दबावामुळे आता केंद्र सरकारनेही नवीन पेन्शन योजनेसंदर्भात एक पाऊल मागे येवून अभ्यास समिती नेमलेली आहे. परंतू आगामी 2024 मधील लोकसभेच्या निवडणूकांवर डोळा ठेवून केंद्र शासन हे कर्मचारी वर्गाला भ्रमीत करत आहे, अशी कर्मचारी संघटनांची धारणा आहे. त्यामुळे अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या बैठकीतील निर्णय लक्षात घेवून 3 नोव्हेंबर 2023 रोजी संसद भवन वर देशव्यापी भव्य मोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे.

नवीन पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करणेबाबत गठीत समितीचा अहवाल तातडीने मिळावा, पीएफआरडीए कायदा रद्द करण्यात यावा, कंत्राटी भरती बंद करावी, खाजगीकरण थांबवावे, विविध संवर्गामधील रिक्त पदे तातडीने भरावीत, थकीत महागाई भत्ता मिळावा व आठव्या वेतन आयोगाचे गठन करावे व कामगार कर्मचारी संघटनेचे लोकशाही अधिकार सुनिश्चित करावेत या मागण्यांकडे बाईक रॅली द्वारे शासनाचा लक्षवेध करून घेण्यासाठी जिल्हास्तरावर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.

त्यानुसार जिल्हास्तरावर राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, जिल्हा शाखा – रत्नागिरी च्या वतीने सदर बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा शाखा रत्नागिरी पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार आहे. बाईक रॅलीचा मार्ग हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टी आर पी ते जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी असा निश्चित करण्यात आला आहे. बाईक रॅलीला बुधवारी सकाळी ठिक 9.30 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून सुरवात करण्यात येईल. बाईक रॅलीमध्ये जिल्हा परिषद मुख्यालय तसेच पंचायत समिती अंतर्गत सर्व कर्मचारी बंधू- भगिनी यांनी सहभागी व्हावे शासनाला आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

19 ऑगस्ट 2023 रोजी चेतना दिनानिमित्त सर्व शासकीय कार्यालयांसमोर निदर्शने करावयाची आहेत. निदर्शनामध्येही जिल्हा परिषद मुख्यालय तसेच पंचायत समिती अंतर्गत सर्व कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जि.प.कर्मचारी महासंघ अध्यक्ष दिनेश सिनकर, सुरेंद्र खाडे, कार्याध्यक्ष व प्रविण पिलणकर, सचिव, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा – रत्नागिरी यांनी केले आहे.