जिल्ह्यात पावसाचा जोर; जगबुडी- वाशिष्ठीने ओलांडली धोक्याची पातळी

रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर वाशिष्ठीचे पाणी चिपळूण शहरातील किनारी भागात शिरले आहे.

मंगळवारी (ता. 25) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या मागील चोविस तासात 77.73 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड 91, दापोली 72.70, खेड 93.50, गुहागर 88.40, चिपळूण 122, संगमेश्‍वर 82.80, रत्नागिरी 48.30, लांजा 57.40, राजापूर 43.50 मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मोठ्या दुथडी भरून वाहत आहेत. सोमवारी पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र मंगळवारी सकाळीपर्यंत जोरदार पाऊस झाला. दिवसा पुन्हा सरींचा पाऊस सुरु होता. त्यामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीची पाणीपातळी 7.45 मीटर एवढी असून धोका पातळी सात मीटर आहे. महाबळेश्‍वर परिसरात पाऊस पडला की जगबुडीचे पाणी वाढते, ही परिस्थिती लक्षात घेऊन जगबुडीच्या किनारी गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दिवसा पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भातशेतीची कामे विनाअडथळा करता येत आहेत. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. नदी किनारी भागातील भातशेतीमधील पाणी ओसरल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. चिपळूणमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चिपळूण शहराला पुराचा धोका वाढला आहे. चिपळूण नाईक कंपनी परिसरात पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. या परिसरात दुकानाच्या पायर्‍या पाण्याखाली गेल्या आहेत. बाजारपेठेमधील रस्ता देखील पाण्याखाली गेले आहेत. रत्नागिरीत जोरदार पाऊस होत आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर चिपळूण शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका संभवतो आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.