मुसळधार कायम! जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते खचले

रत्नागिरी:- वेगवान वार्‍यासह मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. पावसाचा फटका घाटातील रस्त्यांना बसला आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर नाणिज येथे मध्यरात्री रस्ता खचल्यामुळे सुमारे बारा तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प होती. मुंबई-गोवा महामार्गावर कामथे आणि परशुराम घाटातही रस्त्यावर किरकोळ माती खाली आली. मात्र वाहतूकीत अडथळा आलेला नव्हता.

शुक्रवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात 74 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला. त्यात मंडणगड 90, दापोली 121, खेड 62, गुहागर 42, चिपळूण 109, संगेमश्‍वर 61, रत्नागिरी 32, लांजा 59, राजापूर 90 मिमी पाऊस झाला. 1 जुनपासून आतापर्यंत 429 मिमी सरासरी नोंद झाली असून गतवर्षीच्या तुलनेत 200 मिमी कमी पाऊस झाला.
गुरुवारी रात्रीपासून वादळी वार्‍यांसह मुसळधार पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर शुक्रवारी सकाळपर्यंत सुरुच होता. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिर्‍या-रत्नागिरी-नागपूर महामार्गावर नाणिज शाळेजवळ रस्त्याचा भाग खचल्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. खचलेल्या भागामध्ये तिन वाहनेही रुतलेली होती. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या प्रकारामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प झाली होती. कोल्हापूर आणि रत्नागिरी दोन्ही बाजूकडील वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या. यामध्ये दोन ट्रक आणि बस अशी तीन वाहने रुतली होती. ती मोठी वाहने काढण्यासाठी ठेकेदाराने क्रेन बोलावली होती. ती चिखलात रुतल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी छोटी वाहने चोरवणे मार्गे सोडण्यास सुरुवात केली. मोठी वाहने मात्र अडकून पडली होती. हा रस्ता दुरुस्त होईपर्यंत कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक लांजा- दाभोळ मार्गे वळविण्यात आली. या ठिकाणी बारीक दगडांचा भराव टाकण्याचे सुरु करण्यात आले होते. या रस्त्यावर खचलेल्या भागात तिन ते चार ठिकाणी भले मोठे खड्डे पडलेले होते. त्यामधून गाडी हाकणे अशक्य होते. या खचलेल्या रस्ता दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि चौपदरीकरणाचे काम करणारा ठेकेदार कार्यरत होते. हे दुरुस्तीचे काम सुमारे अकरा तासानंतर पूर्ववत झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. वाहतूक ठप्प झाल्यामुळे कोल्हापरहून येणारा भाजीपाला वाहतूक करणारी वाहने उशिराने रत्नागिरीत दाखल झाली.
पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात माती घसरण्याचे प्रकार सुरुच आहेत. आजही सकाळी डोंगरातील माती रस्त्यावर आली होती. तसाच प्रकार कामथे घाटातही घडला. पण दोन्ही ठिकाणी वाहतूकीला अडथळा आलेला नव्हता. रत्नागिरी तालुक्यात उक्षी येथेही रस्त्यावर माती खाली आली होती.

पावसामुळे खेड तालुक्यात किल्ले रसाळगडच्या पायथ्याशी पेठ बौध्दवाडी जवळील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता वहातूकीस बंद झाला आहे. चिपळूण तालुक्यात पिंपळी – नांदिवसे येथे झाड पडल्यामुळे वाहतूक बंद झालेली होती. झाड बाजूला करुन वहातूक सुरळीत सुरु झालेली आहे. पेढांबे अलोरे शिरगाव रस्ता अलोरे दर्ग्याजवळ झाड पडून – एकेरी वहातूक सुरु आहे. झाड काढण्याचे काम सुरु आहे. वेळंब येथील एका घराचे अंशतः नुकसान झाले आहे. खेडच्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. परिणामी प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगबुडी नदीची पाण्याची पातळी पोहोचली 5.5 मीटरवर पाेहचली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार जगबुडीची इशारा पातळी पाच मीटर तर धोक्याचे पातळी सात मीटर एवढी आहे.