आरोही सावंत, भुषण धनावडे; नासाची सैर करताना जिज्ञासा जागृत
रत्नागिरी:- अमेरिकेसारख्या प्रगत देशातील आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्राची सैर करताना ज्या गोष्टी आम्ही कधीच पाहिल्या नव्हत्या, त्याची ओळख झाली. अंतराळात सोडल्या जाणार्या रॉकेटचे प्रकार, त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर आमच्यामधील संशोधक बनण्याची जिज्ञासा वाढली आहे. आम्हीसुध्दा चंद्रावर यान पाठवले पाहीजे, चंद्रावर उतरले पाहीजे अशी इच्छा जागृत झाली अशी प्रतिक्रिया आरोही सावंत, भुषण धनावडे या विद्यार्थ्यांनी बोलताना व्यक्त केली.
जिल्हापरिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील 9 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील ‘नासा’ या अंतराळ संस्थेची सैर घडवून आणण्यात आली. या विद्यार्थ्यांनी रविवारी (ता. 28) दिवसभर नासातील एका विभागाला भेट दिली. तेथे अंतराळातील जग विद्यार्थ्यांना पाहता आले. सर्वच विद्यार्थी प्रथम परदेशात गेले असल्यामुळे विमानात बसण्याची आणि तेथील माहोल अनुभवण्याची संधी मिळाली. सर्वच विद्यार्थी भारावून गेले होते.
हा दौरा यशस्वी करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांचे योगदान आहे. यामध्ये प्रभुती संतोष घागरूम (जि.प.पाथमिक शाळा कोन्हवली, मंडणगड), धनश्री संजय जाधव (जि.प.पाथमिक शाळा शिरसोली नं.1, दापोली), वेदांत विठ्ठल मोरे (जि.प.पाथमिक देवघर निवाचीवाडी, खेड), अभय शिवराम भुवड (जि.प.पाथमिक शाळा, तुरंबव, चिपळूण), सोनाली मोहन डिंगणकर (जि.प.पाथमिक शाळा काजुर्ली नं.2, गुहागर), आरोही दिनेश सावंत (जि.प.पाथमिक शाळा, ओझरखोल, संगमेश्वर), वेदांत बाबुराव सनये (जि.प.पाथमिक कुवारबाव महालक्ष्मीनगर, रत्नागिरी), आशिष अनिल गोबरे (जि.प.पाथमिक शाळा शिरवली, लांजा), भूषण चंद्रकांत धावडे (जि.प.पाथमिक शाळा, पांगरे बु. राजापूर) यांचासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, एस. जे. मुरकुटे आदी दौर्यात आहेत.
प्रत्यक्षात रॉकेट लाँच कसे केले जाते, किती वेगाने ते अंराळात जाते, विशिष्ट अंतरावर गेल्यानंतर त्याचे भाग कसे वेगळे होतात याचा अनुभव या विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी घेतला. अंतराळवीरांच्या प्रतिकृती आणि त्यांनी चंद्रावर स्वारी कशी केली त्याची माहिती विद्यार्थ्यांनी समजून घेतली. चंद्रावर रॉकेट कसे उतरवले जाते याचा अनुभव थ्रीडी शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घेतला. अमेरिकेतील वातावरणाशी समरस होतानाच अलिशान विमानतळ, नासाचे संशोधन केंद्र, तेथे असलेली मोठमोठी अंतराळातील स्पेस हे जवळून पाहता आल्यामुळे विद्यार्थ्यांचा हा दौरा पहिल्याच दिवशी अविस्मरणीय झाला होता.
कोट
रॉकेटचे प्रकार आणि त्याचा इतिहास आम्ही जाणून घेतला. हे पाहिल्यानंतर वाटले की आम्हीसुध्दा अशीची रॉकेट बनविली पाहीजेत. त्यासाठी संशोधक बनायला आवडेल. चंद्रावर यान पाठवून, स्वतः चंद्रावर उतरावे वाटते.
- आरोही सावंत, विद्यार्थीनी, संगमेश्वर
कोट
मी रॉकेटस्चे विविध प्रकार पाहिले. त्यात अपोलोही होते. कोलंबिया, अॅटलांटीसविषयक थ्रीड शो पहायला मिळाले. अंगावर रोमांचे आले होते.
- भुषण धनावडे, विद्यार्थी, राजापूर









