जनतेच्या दारी शासन आणण्याचा आमचा प्रयत्न: मुख्यमंत्री

रत्नागिरी:- “आमचा अजेंडा सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे, त्याचे दिवस बदलले पाहिजेत हा आहे. त्यांच्या जीवनात सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे. शासन जनतेच्या हितासाठी आहे, निर्णय घेणारं शासन असावं लागतं. गेल्या अडीच वर्षांतील कारभार पाहिलाय आणि सरकार कुठे होतं हे आपण पाहिलंय. आम्ही घरी न बसता लोकांच्या दारी शासन आणण्याचा प्रयत्न केला आहे,” असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

“लोकांना कचेरीत चकरा माराव्या लागू नये, सरकारी काम सहा महिने थांब हे आम्हाला बदलायचंय. चकरा मारणं, खेटे मारणं हा शब्द आम्हाला काढून टाकायचा आहे. समाजात शासनाप्रती शासनाप्रती लोकांचं तयार झालेलं मत बदलायचं आहे. म्हणूनच मी आणि देवेंद्र फडणवीसांनी शासनाच्या योजना घरोघरी गेल्या पाहिजे हे ठरवलं” , असं शिंदे म्हणाले.

“अधिकारी वर्ग आता गावोगावी जाऊ लागलेत. तेथील लोकांना लाभ कसा मिळेल हे ते पाहातायत. सरकारनं घेतलेले निर्णय, सुरू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर अधिकारी हे महत्त्वाचा दुवा ठरतील. शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत. ती समान वेगानं धावली पाहिजे. ती समान वेगानं धावल्यास त्या शहराचा, जिल्ह्याचा, राज्याच्या विकास वेगानं होत असतो. आम्ही सरकार स्थापन केल्यापासून अधिकारीही चांगले काम करतायत. पूर्वीप्रमाणे कोणतेही मध्ये स्पीड ब्रेकर नाही, त्यामुळे गाडी सुसाट जायला हरकत नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

आम्ही २४/७ काम करणारे कार्यकर्ते आहोत. मी आज मुख्यमंत्री म्हणून समोर उभा असलो तरी कालही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. बाळासाहेब आणि आनंद दीघे यांनी जी शिकवण दिलीये त्याच माध्यमातून आपण राज्याला पुढे नेतोय, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं.