पुरस्काराने काम करण्यासाठी मिळते नवी प्रेरणा: ना. सामंत

रत्नागिरी:- जिल्हापरिषदेतील सर्व विभागातील कर्मचार्‍यांसाठी पुरस्कार देण्याबाबत विचार करावा, जेणेकरून काम करण्यास प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

कायाकल्प योजनेंतर्गत जिल्हास्तरावरील उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी उपकेंद्रासह जिल्हयातील उत्कृष्ट काम केलेल्या 6 आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका यांना फलोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार, कायाकल्पतील 11 उपकेंद्र व 13 प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्वोकृष्ट काम केलेल्या 91 आशा स्वयंसेविका या सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकिक्सक डॉ. फुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी आरोग्य संजीवनी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रथम पुरुस्कार प्राप्त रामपुर प्राथमिक आरोग्य केंद्र व आंबडवे येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र यांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, भविष्यात जिल्हापरिषदेमार्फत दिले जाणारे पुरस्कार योग्यवेळी दिले पाहीजेत. त्यामुळे कर्मचार्‍यांना नक्कीच प्रोत्साहन मिळते. यामधील आशा स्वयंसेवीका आणि मदतनीस यांना पुरस्कार दिले आहेत. कोरोना काळामध्ये याच आशांनी तळागाळात पोचून चांगले काम केले आहे. प्रत्येक घरात जाऊन लोकांची तपासणी करत होत्या. त्यांचे काम खर्‍या अर्थाने काटेकोरपणे सुरु होते. या पुरस्कारामुळे निश्‍चितच त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. याच पध्दतीने जिल्हा परिषदेतील सर्व प्रकारचे पुरस्कार ठेवले तर सर्वांनाच काम करण्यासाठी जादा उत्साह मिळेल. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले, अंगणवाडीसेविका, आशा या तळागाळात जे चांगले काम करत आहेत, त्यांच्यावरच जिल्हा परिषदेचा डोलारा उभारलेला आहे. त्यांचा सन्मान या पुरस्कारातून करण्यात आला आहे.