शहरातील अतिक्रमण हटाववरून मिलिंद किर – बंड्या साळवी आमने सामने

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याबाबत उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी आणि राष्ट्रवादीचे मिलिंद कीर आमने-सामने आले आहेत. अतिक्रमण हटवण्याच्या या मुद्यावरून या दोन्ही नेत्यांची पुढील राजकारण आणि निवडणुकीची वाटचाल समोर येत आहे. शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी राष्ट्रवादीचे कीर अनुकूल असल्याने ते नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीचे लक्ष्य ठेवून असल्याचा तर्क काढला जात आहे.

सोमवारपासून सुरु होणार्‍या रत्नागिरी शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी विरोध करत आहेत. ग्रामीण भागातून येवून शहरात विविध फळांची विक्री करणार्या महिलांवर ही कारवाई झाली तर शिवसेना स्टाईल आंदोलन करु, असा इशारा बंड्या साळवी यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांची तालुका पातळीवरच्या निवडणुकीची ही तयारी असल्याचे मानले जात आहे. शहराच्या रस्त्यांवर आणि फुटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी शहर व्यापारी संघाने लावून धरली आहे. पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते मिलिंद कीर यांनी व्यापार्‍यांच्या मागणीला पाठींबा दिला. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपरिषदेने सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरु करण्याची पूर्वतयारी केली आहे. पोलिस बंदोबस्ताचीही मागणी सुद्धा करण्यात आली आहे. तत्पूर्वी गेले 3 दिवस ध्वनीक्षेपकावरून अतिक्रमण करणार्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेसंदर्भात वाक्युद्ध सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटाव मोहिम सोमवारपासून सुरु होईल की नाही. याबाबत साशंकता आहे. त्यामुळे या मोहिमेवरून सुरु झालेली राजकीय लढाई काय वळण घेणार? याकडे लक्ष लागले आहे.