रत्नागिरी:- जिल्ह्यातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम 27 एप्रिल पासून हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम 15 जूनपर्यंत राबविली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शाळांतील विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती जि. प. प्रशासनाने दिली.
6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी राबविणेत येणार्या समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती, डिजीटल शाळा, आय. एस. ओ. मानांकन, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, मध्यान्ह भोजन, विविध शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, नवोदय परीक्षा तयारी अशा प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांमार्फत जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये सुरू आहे. मात्र शासनाच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन या मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत आणण्याकरिता शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत ग्रामपंचायत, नगरपालिका हद्दीतील कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाईल. तसेच तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबातील मुलांची मूळ वस्तीतून अन्य वस्तीत स्थलांतरित होणार्या मुलांची, अन्य वस्तीतून शाळा वस्तीत स्थलांतरित होणार्या मुलांची माहिती घेतली जाईल. तसेच वस्ती, वाडी, गाव, वार्ड या स्तरावर सर्वेक्षण करण्यात येईल. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक मंडळे यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच या मोहिमे अंतर्गत जास्तीत जास्त शाळाबाह्य मुलांचा शोध घेणार्या स्थानिक स्वराज्य संस्था व शाळांचा गौरव करण्यात येणार आहे.
घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, स्थलांतरित कुटुंबे, मागास, वंचित, अल्पसंख्याक गटातील वस्त्या, राज्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था आदी ठिकाणी जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.









