परशुराम घाट आजपासून 16 दिवसांसाठी पाच तास बंद

पर्यायी वाहतूक कळंबस्ते-चिरणी मार्गे

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी. मंगळवार 25 एप्रिल 2023 पासून परशुराम घाटातील वाहतूक दोन आठवडे ठराविक वेळेत बंद राहणार आहे. घाटातील रुंदीकरण आणि उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी वाहतूक काही ठराविक वेळेत बंद राहणार आहे. 25 एप्रिलपासून 10 मेपर्यंत दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घाटातील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, हलक्या वाहानांची पर्यायी वाहतूक कळंबस्ते-चिरणी मार्गे वळवण्यात आली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम महत्त्वाच्या टप्प्यावर आलं असल्यानं पावसाळ्यापूर्वी धोकायदायक स्थितीत असलेलं शिल्लक काम मार्गी लावण्यासाठी 25 एप्रिल ते 10 मे अशा 16 दिवसांसाठी दुपारी 12 ते सायंकाळी 5:00 या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. बंद कालावधी हलक्या वाहनांची पर्यायी वाहतूक कळंबस्ते-आंबडस-चीरणी मार्गे वळवण्यात येणार आहे. दरम्यान, या कालावधीत येथून सुटणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या सुमारे शंभरहून अधिक बसेसना पर्यायी मार्गानं न सोडल्यास खोळंबा होणार आहे.

घाटातील वाहतूक दोन आठवडे ठराविक वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या परशुराम घाटाचं चौपदरीकरणाचं काम गेली दोन वर्ष युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यातच रुंदीकरणामध्ये येणारा डोंगर पोखरण्यात आला होता. गेल्या वर्षी हाच घाट प्रवाशांसाठी डोकेदुखी बनला होता. विशेषतः पावसाळ्यात अर्धवट पोखरण्यात आलेल्या डोंगराची माती आणि दरड खाली ढासळल्यामुळे पावसाळ्यात काही दिवस घाटातील वाहतूक बंद करावी लागली होती. मात्र यावेळी रुंदीकरणाच्या ठेकेदार कंपनीनं पावसाळ्यापूर्वी या घाटातील रुंदीकरण आणि उर्वरित कामं पूर्ण व्हावी यासाठी या घाटातील वाहतूक काही दिवस बंद करण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली तर ही मागणी मान्य करून येत्या 25 एप्रिल ते दहा मेपर्यंत हा घाट, या घाटातील वाहतूक ठराविक वेळेत दुपारी 12 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्णतः बंद करण्यात येईल, अशा सूचनाही दिलेल्या आहेत. मात्र या कालावधीत पर्यायी मार्गानं हलकी वाहतूक वळवण्यात येईल, असंही प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण टप्प्यातील परशुराम घाटा अत्यंत अवघड टप्पा आहे. एकीकडे 22 मीटर उंचीचा डोंगर उतार आणि दुसरीकडे घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढेगाव. त्यामुळे येथे डोंगर खुदाईसह अन्य कामे करणे अवघड असतानाही एक मोठे आव्हान स्वीकारण्यात आले. वर्षभरापूर्वी याच घाटात डोंगर खुदाई करतात पोकलेन दरडीखाली सापडून चालकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर वेळोवेळी खबरदारी घेऊन काम सुरू ठेवण्यात आले. सर्वप्रथम पायतालगत असलेल्या गावात सुरक्षित करण्यासाठी उताराच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्यात आली. पहिल्या टप्प्यातील 450 मीटर लांबीची आणि दुसऱ्या सुमारे दहा मीटर उंचीच्या संरक्षित भिंतीचे काम पूर्ण केले. या भिंतीमुळे डोंगराच्या खालील रस्ता सुरक्षित झाला. मात्र आता घाटात अतिशय धोकादायक टप्पा मानला जाणाऱ्या दरडीच्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारली जात आहे.